चंद्रकांत पाटील पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला ‘धर्मांध व्हायरस’! काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 05:53 PM2021-12-17T17:53:30+5:302021-12-17T17:58:37+5:30

Chandrakant Patil News: ज्या विचारसरणीच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, संभाजीराजे यांची बदनामी केली त्याच विचारणीचे वारसदार चंद्रकांत पाटील आहेत.

Chandrakant Patil's 'fanatic virus' in progressive Maharashtra! Criticism of Congress spokesperson Atul Londhe | चंद्रकांत पाटील पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला ‘धर्मांध व्हायरस’! काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची बोचरी टीका

चंद्रकांत पाटील पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला ‘धर्मांध व्हायरस’! काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची बोचरी टीका

Next

मुंबई -  भारतीय जनता पक्ष व त्यांचे नेते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना  फक्त हिंदूंचे राजे म्हणून, हिंदुत्वाशी संबंध जोडून त्यांच्या महान कर्तृत्वाचा अपमान करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही असे विधान करून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला धर्मांध बनवण्याचा प्रयत्न चालवला आहे. चंद्रकांत पाटील हे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला ‘धर्मांध व्हायरस’ आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेत अतुल लोंढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते, त्यांनी अठरापगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन राज्य केले. ते कर्मकांड मानणारे नव्हते. छत्रपती शिवाजी सर्व धर्मांचा सन्मान करायचे, त्यांच्या नौसेनेची धुरा सिद्दी संबल सांभाळत होता. आग्र्यात नजरकैदेतून सुटका करू घेताना मदारी मेहतर या मुस्लीम व्यक्तीने महाराजांना मदत केली. महाराजांच्या अंगरक्षकांमध्येही अनेकजण मुस्लीम होते. त्यांच्या गुप्तहेर विभागात मौलाना हैदर अली होते तर शस्त्रागाराची कमान इब्राहिम खानच्या हातात होती. शिवाजी महाराज कुळवाडीभूषण, शेतकऱ्यांचे कैवारी व बहुजनवादी होते परंतु त्यांचा हिंदू, हिंदुत्व व हिंदु व्होट बँकेशी त्यांचा संबंध जोडून चंद्रकांत पाटील यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांनी इतिहासाचा अभ्यास करून बोलावे, चुकीची, अर्धवट व इतिहासाची मोडतोड करून लोकांची दिशाभूल करु नये.

ज्या व्यवस्थेने महाराजांचे क्षत्रीयपण नाकारत शूद्र ठरविले आणि त्यांचा राज्यभिषेक करण्यास नकार दिला. ज्या विचारसरणीच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, संभाजीराजे यांची बदनामी केली त्याच विचारणीचे वारसदार चंद्रकांत पाटील आहेत. छत्रपती व जिजाऊंची बदनामी करणाऱ्या लोकांचा चंद्रकांत पाटील व त्यांचा पक्षाने कधीही निषेध केलेला नाही. ज्या विचारसरणीच्या लोकांनी महात्मा फुले, सावित्रीमाई यांच्यावर चिखलफेक केली, ज्या विचारसरणीच्या लोकांनी शाहू महाराज यांच्या विरोधात षडयंत्र करून त्यांना विरोध केला त्या विचारणीच्या चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी महाराज यांचा स्वतःच्या हीन राजकीय स्वार्थासाठी धर्माशी संबंध जोडला हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो, असे लोंढे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज व नरेंद्र मोदी यांची तुलना करण्याचा प्रयत्नही भाजपाकडून केला जातो. राजकीय स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी यांचे नाव घ्यायचे व त्यांच्याच नावाची पुन्हा बदनामी करायची हे भाजप व रा. स्व. संघाची जुनीच खोड आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडे कोणताही आदर्श नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजासाठी, देशासाठी महान कार्य केले आहे. त्यांना विशिष्ट चौकटीत बसवून त्यांच्या कार्याचा अवमान करण्याचे पातक चंद्रकांत पाटील व भाजपा करत आहे ते त्यांनी थांबवावे व महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी असेही अतुल लोंढे म्हणाले.

Web Title: Chandrakant Patil's 'fanatic virus' in progressive Maharashtra! Criticism of Congress spokesperson Atul Londhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.