चंद्रकांत पाटलांचा कुख्यात गुंडाकडून सत्कार, राष्ट्रवादीनंतर आता भाजपचेही गजा मारणे कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 10:25 AM2024-08-29T10:25:03+5:302024-08-29T10:26:28+5:30

Chandrakant Patil meet Gangster Gaja Marane : चंद्रकांत पाटील यांनी गजा मारणेची भेट घेतल्यामुळं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Chandrakant Patil's honor from Gangster Gaja Marane, after NCP, now BJP's connection, Pune | चंद्रकांत पाटलांचा कुख्यात गुंडाकडून सत्कार, राष्ट्रवादीनंतर आता भाजपचेही गजा मारणे कनेक्शन!

चंद्रकांत पाटलांचा कुख्यात गुंडाकडून सत्कार, राष्ट्रवादीनंतर आता भाजपचेही गजा मारणे कनेक्शन!

Chandrakant Patil meet Gangster Gaja Marane : पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणे याने मंगळवारी (दि.२७) झालेल्या दही हंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. गजा मारणे याने चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केल्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनीही गजा मारणेची भेट घेतली होती. त्यामुळं वाद निर्माण झाला होता. यानंतर आता गजा मारणे याने चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला आहे. यावरून कुख्यात गुंडासोबत भाजपचेही कनेक्शन समोर येत आहे. त्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मंगळवारी दहीहंडी उत्सव राज्यात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. पुण्यातील कोथरूड भागातही हमराज सार्वजनिक उत्सव मंडळानेही दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. या दहीहंडी कार्यक्रमात कुख्यात गुंड गजा मारणे याने भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या नियोजित दौऱ्यात या मंडळाचा आधी कुठेही समावेश नव्हता. तरीही चंद्रकांत पाटील ऐनवेळी तिकडे कसे गेले? तसंच, गजा मारणेची गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही चंद्रकांत पाटील यांनी त्याच्याकडून सत्कार का स्वीकारला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गजा मारणे हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास आहे. तर चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोथरूडमधून निवडणूक लढवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी गजा मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारल्याची चर्चा आता रंगताना दिसत आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांनी गजा मारणेची भेट घेतल्यामुळं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावरून विरोधक सत्ताधारी भाजपवर निशाणा साधतील. दरम्यान, याबाबत चंद्राकांत पाटील काय प्रतिक्रिया देतात, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गजा मारणेसोबत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट! 
यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी कोथरूडमध्ये गजा मारणे याची भेट घेतली होती. यानंतर पार्थ पवार आणि गुंड गजा मारणे या दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरून राजकीय वर्तुळात टीका झाल्यानंतर ही अतिशय चुकीची गोष्ट घडली, अशी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनीही गजा मारणेची भेट घेतली होती. या भेटीनंतर निलेश लंके म्हणाले होते की, गजा मारणेशी झालेली भेट ही फक्त अपघात होता. गजा मारणेची पार्श्वभूमी मला माहिती नव्हती. 

Web Title: Chandrakant Patil's honor from Gangster Gaja Marane, after NCP, now BJP's connection, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.