पुणे: आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडलाभाजपाशी युती हाच पर्याय असल्याचं सूचवलं आहे. मराठा सेवा संघाच्या 32 व्या वर्धापनदिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा मार्ग या मासिकाच्या संपादकीयमधून त्यांची भूमिका मांडली आहे. खेडेकरांच्या प्रतिक्रियेनंतर आता भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुरुषोत्तम खेडेकर यांच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. खेडेकरांची ऑफर काय आहे, हे आधी बघू आणि नंतर ठरवू', असं पाटील म्हणाले.
काय म्हणाले पुरुषोत्तम खेडेकर ?मराठा सेवा संघाच्या 32 व्या वर्धापनदिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा मार्ग या मासिकाच्या संपादकीयमधून त्यांची भूमिका मांडली आहे. या लेखात पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात की, युवक आणि महिला यांना आकर्षित करण्यासाठी भविष्यकाळात ऊर्जेची गरज आहे. आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी धडपड सुरू पाहिजे. पैशाचे सोंग करता येत नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे विचित्र समीकरण झाले आहे. हे बदलायचे असेल तर संभाजी ब्रिगेड राजसत्तेत आणणे गरजेचे आहे. संभाजी ब्रिगेडचे सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी राजनैतिक संबधात वाढ वा युती याबाबत गंभीरपणे विचार करावा लागेल. महाविकास आघाडीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची इच्छा असली तरी ते संभाजी ब्रिगेडला वाटा देण्यास नकार देण्याची शक्यता अधिक आहे. त्यांची प्रवृत्ती संभाजी ब्रिग्रेडला दूर ठेऊन केवळ त्यांच्या नावाचा व कामाचा एकतर्फी लाभ घेणे आहे. तसेच ते संभाजी ब्रिगेडला गृहित धरून आहेत असा आरोप त्यांनी केला.
तसेच, भाजपा(BJP) सत्तेत आली तरी हरकत नाही, पण संभाजी ब्रिगेडला(Sambhaji Briged) सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे अशी या तिन्ही पक्षांची मानसिकता आहे. तर काही लहान पक्षनेते संभाजी ब्रिगेडबाबत गैरसमज पसरवत असतात. या परिस्थितीत संभाजी ब्रिगेडला सत्ता हस्तगत करायची आहे. संभाजी ब्रिगेडला खूप मर्यादा येतात. स्वबळ अवघड आहे. शेवटी भाजपा युती हाच पर्याय उरतो. तसे संभाजी ब्रिगेडपेक्षा वेगळ्याच अर्थाने भाजपाला अस्पृश्य मानले जाते. मराठा सेवा संघ आणि RSS यांची तत्वे पूर्णपणे परस्परविरोधी आहेत. परंतु राजकारणात अंतिम यश मिळणे हेच एकमेव तत्व असते. याठिकाणी कोणीही कायमस्वरुपी मित्र व शत्रू नसतात. वेळ आणि संधी हेच राजकीय सत्य आहे. लोक काय म्हणतील यावर राजकारण केले जात नाही. शिवसेना-भाजपा आज राणे प्रकरणामुळे एकमेकांचे कट्टर शत्रू झालेत. पण सोन्याचे अंडे देणारी मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी ते पुन्हा एकत्र येऊ शकतात. त्यासाठी तडजोड होऊ शकते असंही पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलं आहे.