अकोले, दि. 12 - राज्यात आजपर्यंत 71 लाख 40 हजार शेतक-यांनी कर्जमाफीचे अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांमध्ये दहा लाख अर्ज बोगस आहेत. बोगस अर्ज भरणा-यांनाच केवळ अर्ज भरण्यात अडचण येत आहे असं विधान राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा राज्य किसान सभेने कठोर शब्दात निषेध व्यक्त केला आहे. तसेच पाटलांचे विधान शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळणारं असून त्यांनी शेतक-यांची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. ''कर्जमाफीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सरकारने ऑन लाईन स्वरुपाची केली आहे. अर्ज भरताना शेतक-यांचा सात बारा, आधार कार्ड, हाताच्या अंगठ्याचे ठसे व पिक कर्जाची माहिती अपलोड केल्या शिवाय ऑन लाईन यंत्रणा अर्जच स्वीकारत नाही. अशा प्रक्रियेमुळे शेतकरी नसलेली कोणतीही ‘बोगस’ व्यक्ती अर्जच भरू शकत नाही अशी वस्तुस्थिती आहे. असे असताना दहा लाख लोकांनी असे ‘बोगस’ अर्ज भरले आहेत असे बेजबाबदार विधान चंद्रकांत पाटलांनी केले आहे. शेतक-यांमध्ये त्यांच्या या विधानाचे अत्यंत संतापजनक पडसाद उमटत आहेत. सरकारने कर्जमाफीसाठी अनेक जाचक अटी शर्थी लागू केल्या आहेत. सरकारच्या या अटी शर्तीमध्ये न बसल्याने लाखो शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार हे उघड आहे. अर्ज भरलेल्या शेतक-यांपैकी अटी शर्ती मध्ये न बसणा-या शेतक-यांना कर्जमाफीसाठी ‘अपात्र’ असल्याचे म्हणणे समजू शकते. मात्र अशा शेतक-यांना ‘बोगस’ म्हणून चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या मनात शेतक-यां विषयी कशा प्रकारे तिरस्कार आहे हेच दाखऊन दिले आहे'' अशा शब्दात राज्य किसान सभेने निषेध व्यक्त केला. ''अर्ज भरण्याच्या जटीलतेमुळे अनेक शेतक-यांना अद्यापही अर्ज दाखल करता आलेले नाहीत. अर्ज भरण्यासाठी आता केवळ चारच दिवसांची मुदत शिल्लक आहे. अनेक शेतक-यांचे आधार कार्ड रिजेक्ट झालेले आहेत. अनेकांकडे आधार कार्ड नाहीत. परराज्यातील आधार कार्ड मधील नंबर अर्ज भरताना नमूद होत नाहीत. अनेक शेतक-यांच्या बोटाचे ठसे उमटत नाहीत. आधार कार्ड मधील चुका दुरुस्त होण्यास वेळ लागत असल्याने मुदतीत अर्ज भरण्याच्या शक्यता मावळू लागल्या आहेत. सर्व्हर डाऊन असल्यानेही अर्ज भरताना अडचणी येत आहेत. अशा अनेक अडचणी असताना केवळ बोगस अर्ज भरणा-यांना अडचणी येत आहेत असे म्हणून या अडचणी असलेले सर्वच शेतक-यांना चंद्रकांत पाटीलांनी बोगस ठरवून टाकले आहे. त्यांचे हे विधान या सर्व शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांचा अधिक अंत न पाहता केलेल्या विधानाबद्दल चंद्रकांत पाटलांनी शेतक-यांची माफी मागावी व उर्वरित सर्व शेतक-यांचे अर्ज ऑफ लाईन पद्धतीने स्वीकारून आधार कार्ड व इतर पुर्ततेसाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभा करत आहे.
चंद्रकांत पाटलांचे विधान शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळणारं, शेतक-यांची माफी मागावी: महाराष्ट्र राज्य किसान सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 3:20 PM
बोगस अर्ज भरणा-यांनाच केवळ अर्ज भरण्यात अडचण येत आहे असं विधान राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात केलं होतं.
ठळक मुद्दे पाटलांचे विधान शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळणारं असून त्यांनी शेतक-यांची माफी मागावी शेतक-यांचा अधिक अंत न पाहता केलेल्या विधानाबद्दल चंद्रकांत पाटलांनी शेतक-यांची माफी मागावी व उर्वरित सर्व शेतक-यांचे अर्ज ऑफ लाईन पद्धतीने स्वीकारून आधार कार्ड व इतर पुर्ततेसाठी मुदत वाढवून द्यावी