आॅस्ट्रेलियन नागरिकांचा सहभाग : हिंदुत्ववादी संघटनांनी उधळला प्रयत्नचंद्रपूर : आॅस्ट्रेलियन व्यक्तींकडून स्थानिक नागरिकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न विश्व हिंंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. घडलेल्या या प्रकाराची व्हिडिओ शूटिंग करण्यात आली असून या प्रकारामुळे चंद्रपुरात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे पोलिसांना सूचना दिली असली, तरी या प्रकरणी पोलिसांकडे अद्याप लेखी तक्रार करण्यात आलेली नाही. धर्मांतराचा हा प्रयत्न हिंग्लाज भवानी मंदिर परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झाल्याचे विहिंप कार्यकर्त्यांनी सांगितले. स्थानिक बाबूपेठ परिसरातील हिंग्लाज भवानी वॉर्डातील जुनोना नाका परिसरात शुक्रवारी सायंकाळी काही आॅस्ट्रेलियन नागरिक पोहोचले. तिथे येण्यापूर्वी एका मध्यस्थाशी झालेल्या चर्चेनुसार ठरल्याप्रमाणे स्थानिक नागरिकांना जमवून बाप्तिस्माचा विधी सुरू झाला. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी गर्दी केली. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही या परिसरात धाव घेतली. या विधीचे मोबाईलवरून छायाचित्र घेण्याचा आणि छायाचित्रण करण्याचा प्रयत्न काही युवकांनी केला, परंतु त्याला विदेशी नागरिकांनी विरोध केला. मात्र नागरिकांनी या प्रक्रियेला विरोध केल्यावर संबंधित मंडळी परिसरातून निघून गेली.या प्रकारानंतर विश्व हिंदू परिषदेचे मंत्री अॅड. हरीश मंचलवार यांनी रामनगर पोलिसात जाऊन तोंडी तक्रार नोंदविली. मात्र या प्रकरणी अद्याप लेखी तक्रार आली नसल्याने आणि कसलेही पुरावे न दिल्याने कुणावरही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिरी यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)पर्यटनाच्या नावाखाली धर्माचा प्रसार- मंचलवारविदेशी नागरिकांकडून पर्यटनाच्या नावाखाली धर्माचा प्रसार आणि धर्मांतराचा प्रकार होत असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे मंत्री अॅड. हरीश मंचलवार यांनी केला आहे. प्रशासनाने विदेशी नागरिकांचा व्हिसा तपासूनच त्यांना फिरण्याची मुभा द्यावी. व्हिसा कोणत्या कामासाठी देण्यात आला, याची चौकशी करून त्यावर लक्ष ठेवले जावे, अशी मागणी अॅड. मंचलवार यांनी केली आहे. या संदर्भात रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
धर्मांतराच्या प्रयत्नाने चंद्रपुरात खळबळ
By admin | Published: January 04, 2015 1:02 AM