माजी शिवसैनिकाचा दे धक्का; ७ नगरसेवक फोडले, १२ जणांचा काँग्रेस प्रवेश रोखताना सेनेच्या नाकीनऊ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 05:35 PM2021-09-16T17:35:39+5:302021-09-16T17:38:33+5:30
पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या ताब्यातील एकमेव नगर परिषद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता
चंद्रपूर: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना स्थानिक पातळीवर वेगळं राजकारण सुरू आहे. तिन्ही पक्ष एकदिलानं काम करत असल्याचा दावा वरिष्ठ नेते करत असताना स्थानिक पातळीवर नेत्यांकडून चढाओढीचं राजकारण सुरू आहे. चंद्रपूरमध्ये त्याचाच प्रत्यय आला आहे. शिवसेनेचे ७ नगरसेवक काँग्रेसनं फोडले आहेत. वरोरा नगरपरिषदेतल्या ७ नगरसेवकांनी शिवबंधन सोडून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.
राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूरात सेनेला धक्का दिला आहे. विशेष म्हणजे धानोरकर याआधी शिवसेनेतच होते. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि खासदार झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी वरोरा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या. वरोरा आणि भद्रावतीमध्ये धानोरकर यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे भद्रावतीमधील शिवसेनेची सत्ता धोक्यात आली आहे.
काँग्रेसकडून टॅलेंट हंट सुरू! दोन तरुण नेते पक्षात प्रवेश करणार?; राहुल गांधींसोबत बैठकांचं सत्र सुरू
वरोरा नगर परिषदेतील शिवसेनेचे ७ नगरसेवक धानोरकर यांनी फोडले. याशिवाय भद्रावती नगर परिषदेतील शिवसेनेच्या १२ नगरसेवकांचा पक्षप्रवेशदेखील आजच संपन्न होणार होता. मात्र शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रशांत कदम भद्रावतीमध्ये तळ ठोकून बसले. नगरसेवकांचा पक्षप्रवेश रोखण्यासाठी त्यांनी जवळपास ४८ तास सूत्रं हलवली. अखेर त्यांना पक्षप्रवेश रोखण्यात यश आलं.
भद्रावती नगर परिषदेवर स्थापनेपासून शिवसेनेची सत्ता
भद्रावती नगर परिषदेची स्थापना १५ ऑगस्ट १९९८ रोजी झाली. तेव्हापासून आजतागायत तब्बल २३ वर्षे महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यात धानोरकरांचा मोठा वाटा होता. त्यामुळे धानोरकर काँग्रेसवासी झाल्यानंतर ते सेनेला खिंडार पाडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. धानोरकर यांच्या नेतृत्त्वाखालीच नगर परिषदेत सेनेची सत्ता आली. त्यामुळे सेनेचे नगरसेवक त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. सध्या तरी सेनेला नगरसेवकांचा पक्षप्रवेश रोखण्यात यश आलं आहे. पूर्व विदर्भातील एकमेव नगर परिषद राखण्याचं आव्हान आता सेनेसमोर आहे.