चंद्रपूर - Narendra Modi on INDIA Allaince ( Marathi News ) २०२४ ची लोकसभा निवडणूक ही स्थिरता विरुद्ध अस्थिरतेची निवडणूक आहे. एकीकडे भाजपा एनडीए आहे ज्यांचा देशासाठी मोठे निर्णय घेणे हे ध्येय आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे. ज्याठिकाणी सत्ता मिळेल तिथे खूप मलाई खायची हा त्यांचा हेतू आहे. इंडिया आघाडीनं देशाला नेहमी अस्थिरतेकडे नेले. स्थिर सरकार का गरजेचे असते हे महाराष्ट्राहून चांगलं कुणास ठाऊक असेल असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.
लोकसभा निवडणुकीसाठी मोदींची चंद्रपूर इथं महाराष्ट्रातील पहिलीच सभा होत आहे. या सभेत मोदी म्हणाले की, इंडिया आघाडीतल्या नेत्यांनी जनादेशाचा अनादर करत राज्यातील सत्ता मिळवली. या लोकांनी घराण्याचा विकास केला. कोणाचा किती हिस्सा असेल, कुठले कंत्राट कुणाले मिळेल, मलाईदार खाते कुणाकडे असेल याहिशोबाने त्यांनी काम केले. महाराष्ट्रात विकासाचा कुठलाही प्रकल्प आला तर आधी कमिशन आणा, नाहीतर कामाला ब्रेक लावू असं धोरण अवलंबलं असा आरोप त्यांनी केला.
त्याशिवाय जेव्हा राज्यात नवीन एअरपोर्ट बनवण्याचा विषय आला तेव्हा इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आधी कमिशन मागितलं. जलयुक्त शिवार योजना बंद केली. विदर्भातील विकासासाठी समृद्धी महामार्गाचं लोकार्पण मी केले त्याचाही विरोध या लोकांनी केला होता. मुंबई मेट्रो, कोकणातील रिफायनरीही रोखली. पंतप्रधान आवास योजनेचे पैसे पाठवले तरी कमिशनसाठी गोरगरिबांना घरे देण्यापासून रोखले. आमचं सरकार येताच आम्ही सर्व योजनांना पुन्हा गती दिली. रात्रंदिवस हे सरकार काम करतेय. हेतू स्वच्छ असला की निकालही चांगला असतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
दरम्यान, काँग्रेसच्या जाहिरनाम्यात मुस्लीम लीगची भाषा वापरली आहे. इंडिया आघाडीचे लोक दक्षिण भारताला स्वतंत्र करण्याची भाषा करतायेत. सनातन धर्म डेंग्यू आहे असं काही नेते म्हणतात. काँग्रेस नकली शिवसेनेला सोबत घेत त्याच नेत्यांना मुंबईत आणून भाषण करते. काश्मीर हा भारताचा भाग आहे. काश्मीर पंडितांची घरे जाळली जात होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे उघडपणे काँग्रेसविरोधात आले होते. बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष पूर्ण ताकदीनं पुढे घेऊन जात आहे असंही नरेंद्र मोदींनी सांगितले.