"काँग्रेसचे काही आमदार-खासदार अस्वस्थ"; बावनकुळेंचं सूचक विधान, राजकीय वर्तुळात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 11:39 AM2024-12-11T11:39:44+5:302024-12-11T11:50:02+5:30

भाजपकडून महाराष्ट्रात 'मिशन लोटस्' राबवले जाणार असल्याच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Chandrashekhar Bawankule clarification on the talks that BJP will implement Mission Lotus in Maharashtra | "काँग्रेसचे काही आमदार-खासदार अस्वस्थ"; बावनकुळेंचं सूचक विधान, राजकीय वर्तुळात खळबळ

"काँग्रेसचे काही आमदार-खासदार अस्वस्थ"; बावनकुळेंचं सूचक विधान, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतरही कदाचित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही धडा घेतलेला दिसत नाही. अशातच आता भाजप महाविकास आघाडीला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. विधानसभेतील पराभवानंतर मविआतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपकडून महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस' राबवले जाणार असल्याची शक्यता आहे. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे खासदार आम्हाला भेटत असतात असं म्हटलं आहे. तसेच आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नसल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

"खोटारडेपणातून त्यांना काही मतं मिळाली आहेत. आता त्यांच्याच निवडून आलेल्या खासदारांना वाटतं की काँग्रेसमध्ये राहून आमचं भविष्य चांगले नाही. त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आणि प्रतिनिधी आम्हाला भेटत असतात. भेटल्यावर त्यांचे दुःख ते मांडत असतात. काँग्रेसचे नेतृत्वाकडून निवडून आलेल्या आमदार खासदारांवर दुर्लक्ष होत आहे. काही लोक अस्वस्थ आहेत," असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं.

"त्यांना त्यांची माणसं सांभाळता येत नाही हा प्रश्न आहे. आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही. आम्ही कधी त्यामध्ये पडतही नाही. ईडी, सीबीआयचे त्यांचे नेहमीचे रडगाणं आहे. आम्ही कधी ईडी, सीबीआयकडे गेलेलो नाही. तपास यंत्रंणा त्यांचे काम वेगळं करत असतात. पण निवडून आलेले प्रतिनिधी सांभाळता येत नाही हे महाविकास आघाडीचे अपयश आहे. त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत. ते आम्हाला भेटून सांगतात की आम्हाला कुणी विचारत नाही, आमचा पक्ष जनप्रितिनिधी म्हणून प्रोत्साहन देत नाही. विकासकामे करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचे समर्थन करत नाही. त्यामुळेच ते अस्वस्थ आहेत," असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

भाजपमध्ये नैतिकता नावाचा प्रकार नाही - संजय राऊत

"भारतीय जनता पक्ष अशी कोणतीही ऑपरेशन्स करू शकतो. त्यांच्याकडे पैसा आहे. त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे. दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणे ते करू शकतात. याआधी देखील एकनाथ शिंदे यांच्यासारखे किंवा अजित पवार यांच्यासारखे लोक का त्यांच्यासोबत गेले? ते देखील भीतीपोटीच भाजपसोबत गेले. ते काय ऑपरेशन लोटस होतं का तर नाही. ते ऑपरेशन डर होतं. भीती दाखवायची आणि पळवायचं आणि मग तुम्ही तिथे गेल्यावर सर्व खटले मागे घ्यायचे. तुमची जप्त केलेली संपत्ती परत द्यायची. हे यांचे धंदे आहेत. नैतिकता नावाचा कोणताही प्रकार मला भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये दिसत नाही," अशी टीका संजय राऊत यांनी केली.
 

Web Title: Chandrashekhar Bawankule clarification on the talks that BJP will implement Mission Lotus in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.