Maharashtra Political Crisis: आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने आतापासूनच कंबर कसली असून, मागील वेळेस थोडक्यासाठी पराभव पत्कराव्या लागलेल्या देशभरातील अनेक मतदारसंघावर भर देण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री कामाला लागले आहेत. दुसरीकडे, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही भाजपने भर दिला असून, नेत्यांच्या भाजपमधील इन्कमिंगला सुरुवात झाली आहे. आगामी काळात भाजपमध्येच इतके लोकं येतील की, मविआला उमेदवारच मिळणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांच्यासह काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मीडियाशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, येणाऱ्या दिवसात भारतीय जनता पक्षामध्ये एवढे प्रवेश होईल की २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांना उमेदवार मिळणार नाही. शिंदे यांचाच गट खरी शिवसेना असून उद्धव ठाकरे यांच्याकडे दोन चार कार्यकर्ते शिल्लक राहतील, असा दावा बावनकुळे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांचा पक्ष नाही तर एक गट आहे
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील अनेक प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. महाविकास आघाडीला २०२४ मध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार मिळणार नाही अशी स्थिती निर्माण होईल. शिवसेनेतील काही कार्यकर्ते शिंदे गटात आणि काही भाजपमध्ये येत आहेत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष नाही तर शिवसेनेतील एक गट आहे. चार पाच लोकांचे ऐकून उद्धव ठाकरेंनी भाजपला धोका दिला, या शब्दांत बावनकुळे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
दरम्यान, वानखडेच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेना भाजपमध्ये आली आहे. याशिवाय विदर्भातील विविध जिल्ह्यातील शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांचाही टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडेल. भाजप-मनसे युतीचे आता काही ठरले नाही. पुढे निर्णय घेऊ असे सांगून बावनकुळे यांनी मनसेशी युतीचे संकेत दिले. शिवसेनेत कार्यकर्त्यांना सन्मान दिला जात नसल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे राजेश वानखेडे यांनी सांगितले.