काँग्रेसमध्ये भूकंप घडवणारी माहिती समोर आली असून, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे पत्र आता समोर आले असून त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिल्याचे दिसून येते. याच दरम्यान भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात धुसफूस असल्याचं म्हटलं आहे.
मोदींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसे काँग्रेसचे अनेक नेते विकसित भारताच्या संकल्पाला साथ देतील असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. "काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू आहे. त्यांच्यात अंतर्गत वाद आहे, नेतृत्वात समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाही. राजीनामा कोणत्या कारणाने दिला हे पाहावं लागेल. काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत धुसफूस आहे आणि मोठमोठे नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. काँग्रेस पार्टीमध्ये अस्वस्थता आहे."
"काँग्रेसचे अनेक नेते विकसित भारताच्या संकल्पाला साथ देतील"
"मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांचं उदाहरण घ्या आणि आता अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. पुढच्या काळात आपल्याला अशी खूप प्रकरणं दिसतील असं मला वाटतं. माझ्याकडे कोणताही याबाबत प्रस्ताव आलेला नाही. मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे. विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी आमची विचारधारा कोणी जर स्वीकारत असेल तर त्यांचं स्वागत आहे. जसं जसं मोदींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं तसे काँग्रेसचे अनेक नेते विकसित भारताच्या संकल्पाला साथ देतील" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा
गेल्या दीड वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी काँग्रेस मात्र एकसंध होता. मात्र, काँग्रेसमधील वरिष्ठ नेते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वावर नाराज होते. त्यातूनच, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिल्याचे समजते. मात्र, चव्हाण यांच्या या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात भूकंप घडल्याची चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाण यांनी आपले राजीनामा पत्र नाना पटोले यांच्याकडे दिले आहे. त्यामध्ये, स्वत:चा उल्लेख करताना माजी विधानसभा सदस्य असे म्हटले आहे. त्यामुळे, त्यांनी आमदाराकीचाही राजीनामा दिल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे आज सकाळीच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते.