मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वव्यापी नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचे रथाचे सारथ्य आणि आमदार आशिष शेलार यांच्यासारखा अर्जुन आपल्याकडे आहे त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी भाजपा आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करुन विजयी होईल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला.
मुंबई भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज दादर येथील वसंत स्मृती सभागृहात पार पडली. या बैठकीला सकाळच्या पहिल्या सत्रात भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी मार्गदर्शन केले. आमदार अतुल भातखळकर यांनी राजकीय प्रस्ताव मांडला. त्याला आमदार अमीत साटम यांनी अनुमोदन दिले. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीला खासदार गोपाळ शेट्टी, पुनम महाजन, मनोज कोटक यांच्यासह सर्व आमदार आणि मुंबई पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीचा समारोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाने झाला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे होते की त्यांच्या खिशाला पेन नाही. त्यांनी कधी कुठल्या पत्रावर शेरा मारला नाही आणि म्हणूनच त्यांना कंटाळून त्यांचे ४० आमदार गेले. उद्धव ठाकरे यांनी पत्रावर मारलेला शेरा दाखवा व एक हजार रुपये मिळवा असा उपरोधिक टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस हे असे नेतृत्व आहे की, प्रत्येक पत्रावर आदेश लिहून प्रशासनाला निर्देश देत राहतात. जनतेसाठी अहोरात्र मेहनत करणारे नेतृत्व आपल्याकडे आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात हजारो जन आज भाजपमध्ये येण्यास तयार आहेत.
आपली वाट पाहत आहेत. मोठे पक्ष प्रवेश आम्ही करु. पण प्रत्येक बुथवर किमान २५ पक्ष प्रवेश कार्यकर्त्यांनी करा. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या किंचित सेनेचे पदाधिकारी तर त्यांना एवढे कंटाळले आहेत की ते आपली वाट पाहत आहेत. त्यामुळे कामाला लागा. असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. प्रत्येक पदाधिका-यांनी २००० घरी प्रवास करणे अपेक्षित असून ५०० घरी धन्यवाद मोदी, ५०० घरांमध्ये फ्रेंडस ऑफ बीजेपी, ५०० युवा वॉरियर्स अशा स्वरुपात कामाला लागायचे आहे. येणारा काळ हा आपला आहे. वातावरण उत्तम, सक्षम नेतृत्व, निर्णय घेणारे केंद्रात आणि राज्यात सरकार यामुळे ‘अभी नही तो कभी नही' असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"