आज मी तुम्हाला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी आलोय, या आंदोलनासाठी. एखादे व्यंगचित्र काढावेसे वाटलेले. चंद्रयान जे चंद्रावर गेलेय त्याचा काय उपयोग आपल्याला. तिथे जाऊन खड्डेच पहायचेत ते महाराष्ट्रात सोडले असते खर्च तरी वाचला असता, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
हा काही मुंबई गोवा महामार्गाचाच भाग नाहीय. नाशिकच्या रस्त्याचीही तिच अवस्था आहे. हे खड्डे काही आज नाही पडलेत. २००७ साली या रस्त्याचे काम सुरु झाले. काँग्रेसचे सरकार गेले शिवसेना भाजपाचे सरकार आले त्यानंतर कोणा कोणाचे सरकार आले. या खड्ड्यांतून जात असताना त्याच त्य़ाच पक्षातील लोकांना कसे मतदान करता याचे आश्चर्य वाटतेय. खड्ड्यातून गेलो आणि मेलो काय? असा सवाल राज यांनी मतदारांना विचारला.
परवा अमित जात होता, तिकडे टोल फुटला तेव्हा भाजपाने टीका केली, रस्ते बांधायला पण शिका, उभे करायला शिका. मला असे वाटते भाजपाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावे. लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायचा आणि त्यांना आतमध्ये आणायचे, मग ती लोकं गाडीमध्ये झोपून जाणार, मी तिथे होता का गाडीमध्ये, निर्लज्ज पणाचा कळस आहे. सरकारमध्ये का आलात, महाराष्ट्राचा विकास करायचाय अरे कशाला खोटं बोलताय. पंतप्रधानांनी ७० हजार कोटींचा घोटाळा काढला त्यानंतर हे आलेत. भुजबळांनी सांगितले असेल आतमध्ये काय काय चालते, अशी टीका राज यांनी अजित पवारांवर केली.
या सगळ्या गोष्टी घडत असताना लोकांना त्रास होतोय. रस्त्यांचा होतोय, वाहतुकीचा होतोय... तरी त्याच त्याच लोकांना निवडून दिले जातेय. कामे नको असतील तर तुमचे तुम्हाला लखलाभो. जर या गोष्टी हव्या असतील तर माझ्या हातात एकदा सत्ता द्या. नाशिकच्या पत्रकारांना विचारा. टेलिव्हिजन चॅनेलचे हेड त्यांना नाशिकच्या खड्ड्यांचे फुटेज पाठवा असे सांगायचे. ते म्हणाले नाहीच आहेत खड्डे तर कुठून पाठवणार. म्हणजे रस्ते चांगले होऊ शकतात. लोकांना मुंबई-नाशिकला येता-जाताना आठ आठ तास लागतात. कोणाला लघवीला जायचे असेल कोणाला अन्य कशाला, स्त्रीयांचे किती हाल, असा प्रश्न राज यांनी मांडला.
समृद्धी महामार्गाला फेन्सिंग टाकलेले नाहीय. त्या महामार्गावर बकरी, हरणे, गुरे येतायत. अचानक गाडीच्या आडवी जनावरे आली तर करायचे काय. आतापर्यंत साडेतीनशे माणसे मृत्यूमुखी पडली आहे. आम्ही फेन्सिंग लावणार नाही पण टोल लावणार. इथे पैसे भरा आणि मरा, अशी सरकारे असतात का हो. कुठे जायचे झाले की युटर्न मारून जावे लागते. मुंबई गोवा महामार्गावर १५५६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. रस्ता झालेला नाही. बाकीच्यांच्या तुंबड्या भरल्या. नितीन ग़डकरींना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितले की मी घातले लक्ष पण कंत्राटदार पळून गेले, काही कोर्टात गेलेत. यामागे कोणाचे काही काम तर सुरु नाहीय ना? कोकणातल्या जमिनी आहेत त्या धडाधड परप्रांतीयांच्या घशात गेल्या आहेत. नाणार रद्द होतोय हे पाहून बारसू सुरु झाले. भोळसट कोकणी बांधव चिरीमिरीसाठी विकून मोकळा होतोय. पाच हजार एकर जमिन कधी एकत्र पाहिलीय का? कुंपणच शेत खातेय, आपलीच लोक आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.
गडकरी आणि मुख्यमंत्र्यांनी २०२४ पर्यंत लोकांसाठी खुला होईल असे सांगितले आहे. पण आताच्या गणपतीचे काय? आतापर्यंत मृत्यूमुखी झालेल्यांचे काय? अडीज हजार लोकांचे जीव गेलेत. गावी, फिरायला गेलो होतो आणि जीव गेले. सगळे ढिम्म आहे. एकमेव कारण आहे, आम्ही काहीही केले, कसलेही रस्ते दिले तरी एका कोणत्यातरी विषयावर ही लोक मतदान करणार, हा धंदा आहे. एखादा रस्ता पुढच्या २५-३० वर्षांसाठी चांगला केला तर पैसे खायचे कसे. तो सहा महिन्यात खराब झाला पाहिजे. नवीन टेंडर नवीन पैसे, नवीन कंत्राट नवीन टक्के. खोके खोके असे ओरडतायत ना त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत. कोविडपण सोडला नाही त्यांनी, अशी टीका राज यांनी केली.