नाशिक - चांदवड-देवळा मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल आहेर यांचे बंधू केदा नाना आहेर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत होते, त्यामुळे राहुल आहेर यांची अडचण झाली होती. मात्र आता राहुल आहेर यांनी भावासाठी आमदारकीचा त्याग करत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच पक्षाने केदा नाना आहेर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत आमदार राहुल आहेर म्हणाले की, मागील १० वर्षात कुटुंब म्हणून पक्षाचं काम आम्ही केले. येणाऱ्या विधानसभेत आम्ही भाजपाचा झेंडा या मतदारसंघात फडकवू. विरोधक यातही राजकारण करतील. राजकारणात आपण जेव्हा काम करतो तेव्हा काही निर्णय घ्यावे लागतात. गेल्या २-३ आठवड्यापासून पक्षात घालमेल सुरू झाली तेव्हा वरिष्ठांना आम्ही विनंती केली. मला उमेदवारी करावी लागेल असं पक्षाने सांगितले होते. परंतु कुटुंब कलह होऊ नये यासाठी आम्ही चर्चा करून निर्णय घेतला आहे. आमच्या निर्णयाला पक्षाने मान्यता दिली असं त्यांनी सांगितले.
तसेच भविष्यात आपल्या सर्वांना एकत्रित राहून महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून आणायचा आहे. प्रत्येक मतदारसंघात विधानसभादृष्टीने वातावरण तापायला लागलं आहे. इच्छुक उमेदवार पक्षाकडे चाचपणी करत आहेत. गेल्या महिनाभरापासून चांदवड मतदारसंघात दादा उमेदवारी करणार की नाना उमेदवारी करणार असा लोकांमध्ये संभ्रम होता. निवडणूक जवळ येत असताना संभ्रम मोठ्या प्रमाणात बळावत चालला होता. त्या संभ्रमातून बाहेर यायला हवं यासाठी आज पत्रकार परिषद बोलावली. आपल्या मतदारसंघात पर्याय देताना सर्वानुमते विचारविनिमय करून भूमिका घ्यायला हवी. १५ दिवस पक्ष नेतृत्वाला भेटत होतो. माझी भूमिका कायमच महायुतीचा उमेदवार विजयी झाला पाहिजे अशी भावना आमदार राहुल आहेर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आम्ही ज्या नेत्याकडे बघून राजकारण करतोय, त्या नेत्याने महायुतीची राज्यात सत्ता यावी यासाठी एका मिनिटांत राज्याचे मुख्यमंत्रिपद त्यागलं. त्यानंतर पक्षाने आदेश दिला म्हणून उपमुख्यमंत्रिपद घेतले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी झाला तेव्हा स्वत:चे उपमुख्यमंत्रिपद अर्धे केले. आमचा सर्वोच्च नेता स्वत:चे मुख्यमंत्रिपद त्यागतो, अशा देवेंद्र फडणवीसांसाठी आमदारकी त्याग करायला आम्हाला १ मिनिटाचाही विचार करण्याची गरज भासत नाही असं राहुल आहेर यांनी सांगितले.
राजकारणापलीकडे कुटुंब, महाराष्ट्रात संदेश
राजकारणापलीकडे कुटुंब असते, आम्ही चर्चेने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राला नवीन संदेश जाईल. राजकारणात अनेक कुटुंब वेगळे होतात पण नाशिक जिल्ह्यात आहेर कुटुंब आजही सत्तेच्या पलीकडे नाती जपतंय, विचारधारा जपतंय हा संदेश महाराष्ट्राला जाईल असं केदा नाना आहेर यांनी म्हटलं.