ऑनलाइन टीम
पंढरपूर, दि. ३० - विठ्ठलाच्या पुजेदरम्यान केले जाणारे पुरुषसूक्त आणि स्त्रीसूक्त मंत्रपठण बंद करुन त्याऐवजी ज्ञानेश्वर माउलींचे पसायदान आणि संत तुकारामांचे मंगलाचरण म्हणावे अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केली आहे. सरकारने यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना पूजा करु देणार नाही असा इशाराही पाटणकर यांनी दिला आहे.
सध्या विठ्ठल पुजेदरम्यान पुरुषसूक्त आणि स्त्रीसूक्त मंत्रपठण केले जाते. तसेच विठ्ठलाच्या मूर्तीला रेशमी वस्त्र नेसवले जाते. या दोन्ही अटींविरोधात श्रमिक मुक्ती दलाने लढा सुरु केला आहे. या लढ्याविषयी माहिती देताना पाटणकर म्हणाले, मंदिराच्या कायद्यात पुरुषसूक्त पठण आणि रेशीमवस्त्राची अट विनाकारण टाकण्यात आली. विठ्ठलाने नेहमीच समानतेचा संदेश दिला असतानाच या अटींमुळे समाजात विषमता निर्माण होतो. मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करुन दोन्ही अटी रद्द कराव्यात अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली. या मंत्रपठणाऐवजी पसायदान व मंगलचरण म्हणावे असा पर्यायही पाटणकर यांनी सुचवला आहे.
यासंदर्भात गेल्यावर्षी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यांनी योग्य निर्णय घेऊ असे आश्वासनही दिले होते. मात्र अद्याप निर्णय घेण्यात आलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी यंदा निर्णय घेतला नाही तर त्यांना एकादशीला विठ्ठल मंदिरात पूजा करु देणार नाही असा इशाराच त्यांनी दिला. तसेच आषाढी एकादशीला मुख्यमंत्री आणि कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्याची पंरपराही बंद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. हा विषय आता हायकोर्टात नेण्याचा विचारही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.