मुंबई - साई बाबा यांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीवरून सुरू झालेला वाद आता संपला असं चित्र निर्माण झाले असताना आता पाथरीचे नामांतर करण्याची मागणी होत आहे. साई बाबा यांची जन्मभूमी असलेल्या पाथरीचे नाव बदलून 'साई धाम' करावे, अशी मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली आहे. त्यामुळे साई जन्मभूमीचा वाद आता पुन्हा चिघळतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई बाबांच्या जन्मभूमीच्या विकासासाठी विकासनिधी जाहीर केल्यानंतर हा वाद उफळून आला. पाथरी साईबाबांची जन्मभूमी असल्याच्या दाव्याला शिर्डीकरांनी विरोध केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद निवळला होता. मात्र जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी आता या मुद्दावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पाथरी साईबाबांची जन्मभूमी असल्याचे आता कागदोपत्री सिद्ध झालेच आहे. हे सर्वांना ठावूक होण्यासाठी पाथरीचे नामांतर करून साई धाम असे करावे, अशी मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. परभणी जिल्ह्यातील प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्न करावे यासाठी त्या आग्रही आहेत.
मेघना बोर्डीकर यांच्यासह परभणी जिल्ह्यातील अनेक नेत्यांचे साई बाबांच्या जन्मभूमीच्या मुद्दावर एकमत झालेले आहे. बोर्डीकर यांच्यासह आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी नगर परिषदेला नामांतरासाठी ठराव घेण्यास सुचविले आहे. यासह बोर्डीकर यांनी जन्मभूमी पाथरी ते कर्मभूमी शिर्डी असा कॉरिडोर सुरू करण्याची मागणीही केली आहे.