लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एसटीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन दर महिन्याला ७ तारखेला दिले जाते. चालक वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी याना वेतन मिळाले आहे. मात्र, एसटीच्या प्रशासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत वेतन मिळाले नव्हते, यामुळे वेतन सोमवार वा मंगळवारी मिळण्याची शक्यता आहे.
एसटी महामंडळ आधी आर्थिक अडचणीत असताना, कोरोनामध्ये मोठे नुकसान सोसावे लागले, त्यामुळे सरकारने मदत केल्यानंतरच कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात येते. कोरोनापूर्व काळात दररोज एसटीचे ६५ लाख प्रवासी आणि २२ कोटींचे उत्पन्न होते, तरीही ३ कोटींची तूट होती. मात्र, कोरोना आणि संप यामुळे एसटीचा मोठा प्रवासीवर्ग दुरावला आहे. सद्यस्थितीमध्ये दररोज २८ कोटी रुपये उत्पन्नाची आवश्यकता असताना १३ कोटींची उत्पन्न मिळत आहे, तर प्रवासी संख्याही ३० लाखांवर आली आहे. प्रशासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेतन देण्यासाठी २५ कोटींचा निधी नसल्याने वेतन रखडल्याचे सूत्रांनी सांगितले.
११७ कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय चांगला आहे, पण महामंडळाला एका पैशाचीही मदत जाहीर झालेली नाही. दिवाळी भेट, महागाई भत्ता तत्काळ मिळणे गरजेचे असताना, त्यावर काहीही निर्णय झाला नाही. प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी यांना वेळेवर वेतन न देणे हे निंदनीय आहे. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस.