मुंबई : मुंबईत लोकल प्रवास करताना गर्दीमुळे लोकांचा जीव जात असेल तर कामकाजाच्या वेळा बदला. पाच वाजताच महाविद्यालये सुटली पाहिजेत किंवा सरकारी कार्यालयाचे कामकाज संपले पाहिजे, ही पद्धत आता बदला. लोकांच्या जिवापेक्षा पैसा श्रेष्ठ नाही. राज्य सरकारने आता जागे व्हावे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले.ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलचा एक डबा आरक्षित ठेवण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र ज्येष्ठ नागरिक ए.बी. ठक्कर यांनी उच्च न्यायालयाला पाठवले होते. या पत्राची गंभीर दखल घेत न्यायालयाने सुओमोटो दाखल करून घेतले. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एस.बी. शुक्रे यांच्या खंडपीठापुढे होती.या सुनावणीवेळीच खंडपीठाने गर्दीमुळे प्रवाशांचे बळी जात असलेचा मुद्द्यावरून सरकारला अनेक सुचना केल्या. लोकलची गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्यालये, महाविद्यालये-शाळेच्या वेळा आणि आठवड्याची सुटी बदलण्याबाबत गांभीर्याने विचार करा, अशी सूचनाही खंडपीठाने केली. तसेच लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीवर रेल्वेचे नियंत्रण का नाही, अशी विचारणा करत खंडपीठाने रेल्वे प्रशासनाला लोकलच्या काही मार्गांवर लोकल चालवण्याचे अधिकार राज्य सरकार आणि महापालिकेला देण्याची सूचना केली. राज्य सरकार लोकल चालवणार का, असा सवाल करत खंडपीठाने एका आठवड्यात सरकारला उत्तर देण्यास सांगितले आहे.ज्येष्ठांसाठी काय केले?लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी संपूर्ण डबा न देता केवळ एक दरवाजा आणि फक्त १४ आसने का उपलब्ध करून दिली जातात, असा सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे बोर्डाला याविषयी काही उपाय सुचवण्यास सांगितले होते.यासंदर्भात रेल्वेच्या वतीने बुधवारी प्रतिज्ञापत्र पत्र सादर करत माहिती दिली की, सध्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची आकडेवारी १ टक्का आहे. त्यामुळे इतरांची प्रचंड गर्दी लक्षात घेता एक दरवाजा आणि १४ जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित करणे शक्य आहे. याशिवाय प्रत्येक स्टेशनवर ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्प डेस्क उभारलेले आहेत. या ठिकाणी पोलीस उपस्थित असतात, असेही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र यावर समाधान न झाल्यामुळे खंडपीठाने रेल्वेला या संदर्भात काही ठोस उपाय सुचवण्यास सांगितले. (प्रतिनिधी) जखमींसाठी पुढाकार घ्यावा...रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करा. अपघात झालेल्या पीडिताला झालेली जखम गंभीर स्वरूपाची असते. त्यामुळे स्टेशन मास्तर येईपर्यंत वाट न पाहता लोकांनी पीडिताला रुग्णालयात दाखल करण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहनही खंडपीठाने नागरिकांना केले.रबरी खांब असावालोकलच्या डब्यात चढण्यासाठी आधार असलेला स्टीलचा खांब रबरी करण्याची सूचनाही खंडपीठाने रेल्वे प्रशासनला केली. स्टीलच्या खांबामुळे लोकांच्या हाताची पकड सुटत असेल तर रबरी खांब उभे करा. त्यावर रेल्वेने प्रवासी याच स्टीलच्या खांबाचा आधार घेऊन लोकलमध्ये चढत असल्याने रबरी खांब बांधणे शक्य नसल्याचे खंडपीठाला सांगितले.छोट्या बस चालवारेल्वेला बसचा पर्याय असल्याने खंडपीठाने रस्त्यावरून मोठ्या आकाराच्या बस चालवू नका, अशी सूचनाही केली. गर्दीच्या वेळेत रस्त्यावरही अत्यंत ट्रॅफिक असल्याने ते टाळण्यासाठी सरकारने मोठ्या बस चालवू नयेत. छोट्या बस चालवा. जेणेकरून अन्य वाहनांना पुढे सरकण्यासाठी मार्ग मोकळा होईल, अशी सूचना खंडपीठाने सरकारला केली.
कार्यालये, शाळांच्या वेळा बदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2015 3:04 AM