- पंकज पाटील , बदलापूर
वेगवेगळ्या कारणांमुळे गेले चार दिवस कर्जतहून सकाळच्या वेळी येणाऱ्या लोकलना उशीर होत असल्याने बदलापूरच्या प्रवाशांत खदखदत असलेला संताप शुक्रवारी पहाटे बाहेर पडला. पहाटे ५.०५ ची मुंबईला जाणारी लोकल तांत्रिक कारणामुळे रखडल्याने प्रवाशांनी एकत्र येऊन बदलापूर स्थानकात उत्स्फूर्त रेल रोको आंदोलन करत तब्बल सहा तास वाहतूक रोखून धरली. रेल्वेमंत्र्यांनी दखल घेत डीआरएमना पाठवण्याचे आणि वाहतुकीत आमूलाग्र सुधारणा करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही प्रवाशांचा रोष कमी होत नव्हता. प्रवाशांच्या समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन चार वेळा दिल्यावरही हे आंदोलन शमण्याची चिन्हे दिसत नसल्याने पोलिसांनी अखेर बळाचा वापर करत प्रवाशांना रुळांवरून बाहेर काढत सकाळी सव्वाअकरा वाजता वाहतूक सुरू केली. बदलापूर रेल्वे स्थानकात पहाटे ५.०५ वाजता येणारी मुंबई लोकल तांत्रिक बिघाडामुळे भिवपुरी स्थानकाजवळ थांबवण्यात आली. ही लोकल येण्यास जसजसा विलंब होत होता, तसतशी प्रवाशांची गर्दी वाढत होती आणि संतापही वाढत होता. या बिघाडाची सूचनाही रेल्वेने खूप उशिराने दिल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडली. अखेर, ही लोकल पहाटे ५.३० वाजता स्थानकात पोहोचली. ती येताच संतप्त प्रवाशांनी ती बदलापूरलाच रोखून धरली. संतप्त प्रवाशांनी मुंबईची वाहतूक रोखून धरल्यावर उर्वरित प्रवाशांनी कर्जतच्या दिशेने जाणारी वाहतूकही रोखून धरली. दोन्ही दिशांची वाहतूक पूर्णपणे ठप्प करून आंदोलकांनी रुळांवरच ठाण मांडले. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. कामावर जाण्याची वेळ असल्याने क्षणोक्षणी आंदोलनात प्रवाशांची भर पडत होती. तिन्ही फलाट, रूळ, क्रॉसिंग सर्वत्र प्रवाशांची तुडुंब गर्दी होती. हा हा म्हणता या आंदोलनाचे लोण शहरभर पसरत गेले. दोन्ही दिशांना गाड्यांच्या रांगा लागल्या. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वे प्रवासाच्या रोजच्या त्रासामुळे मेटाकुटीस आलेले प्रवासी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. जोपर्यंत रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुधारण्याचे, बदलापूरच्या रेल्वे व्यवस्थेत सुधारणेचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोवर आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अखेर, नरमाईची भूमिका घेत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करत असल्याचे लेखी आश्वासन दिले. पण त्यात ठोस काहीच नसल्याचा आरोप करत एका प्रवाशाने ते पत्र फाडून टाकल्याने पुन्हा आंदोलन सुरू झाले. या प्रवाशांना रुळांवरून दूर करण्याचा प्रयत्न पोलिसांनी अनेक वेळा केला. मात्र, बळाचा वापर केल्यास आंदोलन चिघळण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढत त्यांना दूर करण्यावर भर दिला. सकाळी ८ वाजता पुन्हा प्रवाशांच्या मागण्या मान्य केल्याचे रेल्वेने जाहीर केले. मेल-एक्स्प्रेसमुळे लोकल वाहतुकीला बसणारा फटका आणि लोकलचा रोजचा विलंब यावर तोडगा काढण्याचे पुन्हा लेखी आश्वासन दिले. तरीही प्रवाशांनी आंदोलन मागे घेतले नाही. साधारण चार वेळा अशी चर्चा झाल्यावर प्रवाशांगणिक मागण्या वाढत असल्याचे पाहून पोलिसांची मदत घेत रेल्वेने आंदोलन मोडून काढण्याच्या हालचाली सुरू केल्या. रेल्वे सुरक्षा बलासह शहरातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बदलापूर स्थानकात परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी आले. पोलिसांची कुमक वाढवण्यात आली. अखेर, अतिरिक्त पोलीस आयुक्त शरद शेलार यांनी रेल्वे स्थानकातील परिस्थितीची माहिती घेतली आणि आंदोलक प्रवाशांना बाजूला करतानाच गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले. प्रमुख आंदोलकांना रुळांवरून बाजूला करत बळाचा वापर करत स्थानकात अडवण्यात आलेल्या दोन्ही दिशांच्या लोकल बाहेर काढल्या. त्यासरशी आंदोलन मागे घेतल्याचे वातावरण निर्माण झाले. सोडलेल्या गाड्यांतून काही प्रवासी रवाना होताच आंदोलनाचा जोर कमी होत गेला. त्यापाठोपाठ दोन्ही दिशांच्या मार्गांवर अडकलेल्या मेल-एक्स्प्रेस, लोकलही लागोपाठ सोडण्यात आल्या आणि तब्बल सहा तासांनंतर रेल्वे वाहतूक सुरू झाली. बदलापुरातील आंदोलनाच्या काळात ठाणे, कल्याण, अंबरनाथ स्थानकांत काही गाड्या रद्द करून त्या तेथूनच माघारी पाठवण्यात आल्या. तर काही मेल-एक्स्प्रेस कर्जत-पनवेलमार्गे वळवण्यात आल्या. वाहतूक सुरू केल्यानंतरही अडकलेल्या गाड्या जाऊन मार्ग मोकळा होईपर्यंत तास-दीड तास वाहतूक खूप धिम्या गतीने सुरू होती. बदलापूर-कल्याण या प्रवासाला तिप्पट वेळ लागत होता. या आंदोलनाचा फटका मध्य रेल्वेच्या सर्व वाहतुकीला बसला. वेळापत्रक पूर्णत: कोलमडून गेले. (प्रतिनिधी)‘ती’ ट्रेन दहा दिवसांत नियमितसकाळी बदलापूरला वीस मिनिटे उशिराने आलेली लोकल ही गेल्या दहा दिवसांत वेळेत आणि नियमित धावत असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे. १ ते १0 आॅगस्टपर्यंत वेळेत धावली. त्यानंतर ११ आॅगस्ट रोजी त्याच ट्रेनला नऊ मिनिटे उशिर लागला व १२ आॅगस्ट रोजी त्याला वीस मिनिटे लेटमार्ग लागल्याचे सांगण्यात आले. बदलापूर येथून लोकल सोडण्यात याव्यात याचबरोबर लोकलच्या पुढे मेल-एक्सप्रेस ट्रेनला जागा देण्यात येऊ नये, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल्या. लांब पल्ल्याच्या स्थानकांसाठी अनेक फेऱ्यामध्य रेल्वेकडून लांब पल्ल्यावर असणाऱ्या स्थानकांसाठी अनेक लोकल फेऱ्या चालविल्या जातात. यात सीएसटी ते कसारासाठी १५१, सीएसटी ते खोपोलीसाठी २५१, त्याचप्रमाणे बदलापूरहून सुटणाऱ्या आणि शेवट होणाऱ्या ६८ ट्रेन असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. बदलापूर येथून सुटणाऱ्या गर्दीच्या वेळेत सकाळी सात आणि संध्याकाळी नऊ लोकल चालविल्या जातात.
वेळापत्रक पूर्णत: कोलमडून गेलेबदलापुरातील आंदोलनाच्या काळात ठाणे, कल्याण, अंबरनाथ स्थानकांत काही गाड्या रद्द करून त्या तेथूनच माघारी पाठवण्यात आल्या. तर काही मेल-एक्स्प्रेस कर्जत-पनवेलमार्गे वळवण्यात आल्या. वाहतूक सुरू केल्यानंतरही अडकलेल्या गाड्या जाऊन मार्ग मोकळा होईपर्यंत तास-दीड तास वाहतूक खूप धिम्या गतीने सुरू होती. बदलापूर-कल्याण या प्रवासाला तिप्पट वेळ लागत होता. या आंदोलनाचा फटका मध्य रेल्वेच्या सर्व वाहतुकीला बसला. वेळापत्रक पूर्णत: कोलमडून गेले. महिलाही रुळांवरदररोजच्या उशिराला कंटाळलेल्या महिलाही रुळांवर उतरलेल्या होत्या. फलाटांवरही महिलांची संख्या लक्षणीय होती. आंदोलनात त्याही तावातावाने भूमिका मांडत होत्या. नंतर पोलिसी बळावर वाहतूक सुरू होताच सर्वात आधी ती गाडी पकडण्याची घाईही महिलांमध्येच अधिक होती. वादग्रस्त वक्तव्यामुळे अमिताभ ओझांची बदलीसमाजविघातक शक्तींमुळे हे आंदोलन वाढल्याची प्रतिक्रिया देणे रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांना महागात पडले. सायंकाळी रेल्वेने त्यांची बदली केली. त्यांच्या जागी बिलासरपूरचे रवींद्र गोएल यांना पाचारण करण्यात आले आहे.