मुंबई : नदी धोरणानुसार नद्यांपासून ३ किलोमीटरपर्यंत औद्योगिक विकास करू नये, अशी अट शिथिल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने नदी परिसरात उद्योग सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाणे, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारी धरणेही धोक्यात येतील, अशी भीती विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ते म्हणाले, नदी धोरणात बदल केल्यामुळे कालपर्यंत ज्या मुळशी धरणाकडे हिल स्टेशन उभारण्यास परवानगी मिळत नव्हती ती आता सहज मिळेल. कोणत्या उद्योगपतींना फायदा होण्यास या धोरणात बदल केला, असा प्रश्न उपस्थित करतानाच हा बदल तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. अरबी समुद्रात शिवस्मारकाचे भूमिपूजन १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी करण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. मात्र प्रत्यक्षात भूमिपूजन झाले नाही. अशा प्रकारे शिवरायांच्या नावाने सत्ता मिळवून या शासनाने शिवरायांचा अवमान केला आहे. रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मदर तेरेसा यांच्याबद्दल अनुद्गार काढल्यामुळे त्यांचा निषेध करावा तितका थोडा आहे, असेही विखे-पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)
‘धोरण बदलल्याने जलप्रदूषण वाढणार’
By admin | Published: February 25, 2015 2:36 AM