उस्मानाबाद : गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री नियुक्त करण्याची आवश्यकता आहे का? या प्रश्नावर मी बोलणे योग्य नाही, कारण मी मुख्यमंत्री असतानाही माझ्याकडेच गृहविभाग होता. मात्र, राज्यातील वाढती गुन्हेगारी पहाता गृह खात्याचा कारभार अधिक निगराणीने पाहणाऱ्या व्यक्तीची आज गरज आहे, असे सांगत एकप्रकारे गृह खात्याचा कारभारी बदलण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
उस्मानाबाद येथे एका पोलिस उपनिरीक्षकाने रिव्हॉल्वरचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. यासंदर्भात पवारांनी रविवारी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन या गुन्ह्यातील दोषींविरुध्द फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची मागणी केली. पीडिताची ओळख जाहीर होऊ नये म्हणून त्यांनी तिची व तिच्या कुटुंबीयांची भेट टाळली, असे पवार यांनी सांगितले.
विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पोलीस फौजदाराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची उस्मानाबाद येथील घटना संतापजनकआहे. आरोपी पोलीस खात्यातील असला तरी त्याला कसलीही सहानभुती मिळता कामा नये. शासनाने चांगला सरकारी वकील नियुक्त करून ही केस जलदगती न्यायालयात चालवून आरोपीवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करावेत. राज्यात अलिकडील काळात वाढलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील मुलींमध्ये अस्वस्थता आहे. नगर जिल्ह्यात झालेल्या घटनेवेळीच याची नोंद घेतली होती. नव्या पिढीला अस्वस्थ करणारा हा प्रश्न आहे. त्यामुळेच आम्ही सर्वांनी तातडीने उस्मानाबादला येण्याचा निर्णय घेतला.