ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १२ - शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक समस्या भेडसावित असतात. बहुतांश प्रसंगी एकमेकांशी, पालक किंवा वरिष्ठांसोबत चर्चा करून त्यांचे निराकरण केले जाते; मात्र ज्यांची वाच्यता कुठेच करता येत नाही, अशा न सुटणा-या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांची घुसमट होते व टोकाची भूमिका घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो. विद्यार्थ्यांची ही घुसमट जाणून घेण्यासाठी, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संभाजी ब्रिगेड व युवा गर्जना संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे. या संघटनांच्या पदाधिकाºयांनी व्हॉट्सअॅप क्रमांकाच्या माध्यमातून ‘परिवर्तन स्टुडंट हेल्पलाइन’ कार्यान्वित केली आहे.
२१ वे शतक हे स्पर्धेचे असून, सर्वच बाबतीत जगात जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक व झपाट्याने बदल झाले असून, अव्याहतपणे ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आज प्रत्येक विद्यार्थी आपापल्या परिने धावत असल्याचे दिसून येते. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते. अभ्यासावर लक्ष केंद्रित करीत असताना उद्भवणाºया विविध समस्यांचे निराकरण सामान्यत: एकमेकांसोबत चर्चा करून सोडविले जाते. त्या सुटत नसल्यास पालक वा ज्येष्ठांचा आधार घेतला जातो; मात्र अनेक समस्या अशाही असतात ज्यांची वाच्यता विद्यार्थी कुठेच करीत नाहीत. अनामिक भीतीमुळे निमूटपणे सहन करणे इतकाच पर्याय त्यांच्यासमोर शिल्लक राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांकरवी टोकाची भूमिका घेतली जाते, अशी घुसमट सहन करणाºया विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी संभाजी ब्रिगेड अकोला शाखा व युवा गर्जना या दोन्ही संघटनांच्या पदाधिकाºयांनी एकत्रित येऊन ८४१२0१४३0७ व या मोबाइल क्रमांकावर ‘परिवर्तन स्टुडंट हेल्पलाइन’सुरू करण्यात आली आहे. हेल्पलाइन क्रमांकावर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून किंवा फोनद्वारे विद्यार्थ्यांना संपर्क साधता येणार आहे.