लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आगामी विधानसभा निवडणुका पारदर्शी आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी राज्यातील तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणारे अधिकारी, तसेच गृहजिल्ह्यात नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांच्या येत्या दोन दिवसांत बदल्या करून त्या संदर्भातील प्रमाणपत्र सादर करा, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी राज्य सरकारला दिले.
बदल्यांचा मुद्दा आम्ही गांभीर्याने घेतला आहे. दोन दिवसांत बदल्या करा; त्यात कोणताही अधिकारी अथवा विभाग अपवाद असू नये, अशा स्पष्ट सूचना मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना दिल्या आहेत. यात कोणताही पुनर्विचार करणार नाही, असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाच्या निर्देशांकडे झाले दुर्लक्षआयोगाचे पथक दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी राज्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. पत्रकार परिषदेत त्याबाबत माहिती देताना राजीव कुमार म्हणाले की, तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची सूचना निवडणूक आयोगाने यापूर्वीच राज्य सरकारला केली होती. त्याची पूर्तता झाल्याचे प्रमाणपत्र राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना निवडणूक आयोगाला सादर करावे लागते. मात्र, या बदल्याच न झाल्याने आणि आयोगाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याची गंभीर दखल आयोगाने घेतली आहे.
गृहजिल्ह्यातच ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांचीही बदली कराकाही अधिकारी आपल्या गृहजिल्ह्यात तैनात आहेत. निवडणूक काळात अशा अधिकाऱ्यांची बदली ते रहिवासी असलेल्या जिल्ह्याच्या बाहेर करायची असते, त्याबाबतही आयोगाने केलेल्या सूचनांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचे सांगत, या सर्व बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत, असे राजीव कुमार यांनी सांगितले.
राज्यात २६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईलराज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार, ही निवडणूक पुढे ढकलली जाणार का? अशा चर्चा सुरू असतानाच राज्यात २६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल, असे सांगत विधानसभा निवडणूक वेळेवर होण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी दिले.
रश्मी शुक्ला यांच्या बदलीवर योग्य वेळी निर्णयराज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेसने आयोगाकडे केली आहे.याबाबत विचारले असता वैयक्तिक तक्रारीबाबत आम्ही पत्रकार परिषदेत चर्चा करत नाही. नियमानुसार या तक्रारीवर काम करून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे राजीव कुमार म्हणाले.
मराठीत सुरूवात.. ‘आमचा महाराष्ट्र आमचे मतदान’मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकारपरिषदेची सुरूवात मराठीतून केली. ‘आमचा महाराष्ट्र आमचे मतदान’, असे म्हणत त्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदार योगदान देतील असे ते म्हणाले. ‘आपले मत आपला हक्क’ असा नाराही त्यांनी दिला.