जालना - आम्ही सरकारच्या आशेवर नाही. पोरांचे नुकसान व्हायला लागलंय मग आणखी किती दिवस वेळ द्यायचा? आता मराठ्यांनी ठरवलंय घराघरातून मराठे मुंबईत येणार आहे. आमची तयारी सुरू आहे. जे मुंबईत येणार नाही ते जिथे असतील तिथून आंदोलनात उतरणार आहे. सरकार गुप्तपणे आकडेवारी काढतंय पण तुमचे गणित कोलमडून जाणार आहे. मुंबईत ३ कोटी मराठा दिसतील. पुण्याच्या पुढे गेले आणि पनवेलजवळ पाहिले तर ३ कोटीला कमी पडले तर नाव बदलून ठेवा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुंबईत जायची वेळ येणार आहे. त्यामुळे मराठे कामाला लागले आहेत. दारोदारी जाऊन समाजाला जागरुक करत आहोत. लाखोंच्या संख्येने मराठा समाज सहभागी होणार आहे. काही मुंबईत येतील काही रस्त्यावर निरोप द्यायला येतील. प्रत्येकाला लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. ओबीसी नेते जितक्या सभा घेतात तितका आमचा समाज आणखी एक होतोय. सुप्रीम कोर्टातील आरक्षण टिकणार आहे का हा मुद्दा आहे. सातारच्या गादीला मी प्रचंड मानतो. त्याबद्दल एक शब्दही काढणार नाही. ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण झाले तर टिकत नाही हे आधी पाहिलेले आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मुंबईला जाण्याचा मार्ग ठरवला आहे. आजही बैठक झाली. कुठे कुठे मुक्काम करायचा, तिथे सगळ्या गोष्टींची व्यवस्था आहे की नाही याचा आढावा घेतला जातोय. १५ तारखेला पत्रकार परिषद घेऊन कुठे कुठे मुक्काम असेल हे जाहीर करू. आम्ही मुंबईला जाण्याच्या तयारीत आहोत. किती दिवस संयम पाळायचा, गोरगरिब मराठा लेकरांसाठी ७ महिने वेळ दिला. तुम्ही जाणुनबुजून करताय हे वाटायला लागलंय. त्यामुळे आज-उद्या करण्यात पोरांचे वाटोळे होतंय, समाजाची पोरं मोठी व्हायला पाहिजे हे आम्ही ठाम ठरवलंय त्यामुळे आमचे मुंबईला जायचंय हे फिक्स आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, आमच्या नोंदी सापडलेल्या असतानाही कायदा पारित होत नाही. बैठका होत राहतात मात्र त्यातून काही होत नाही. २० जानेवारी रोजी मुंबईला निघण्याची तयारी झालेली आहे . तयारी अंतिम टप्प्यात आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही. किती लोक येणार आहे याचा शोध घेण्यासाठी सरकारी यंत्रणाही कामाला लागली आहे असे जरांगे म्हणाले.