राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आज दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. मुंबईतील नियोजित सर्वच कार्यक्रम सोडून ते दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीतच आहेत. त्यामुळे, पवारांच्या दिल्ली दौऱ्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील पुढील काही महिन्यात महाराष्ट्रात मोठा बदल दिसून येईल, असा मोठा दावा केला आहे."लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेत येईल. तुम्हाला जो अपेक्षित बदल आहे तोदेखील दिसून येईल. मार्च महिन्यापर्यंत बदल दिसून येतील," असं नारायण राणे यावेळी म्हणाले. "जे काही आहे ते सर्व आता सांगता येणार नाही. सरकार पाडायचं असेल किंवा नवं सरकार स्थापन करायचं असेल तर गोष्टी या गुप्त ठेवाव्याच लागतात," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
आगामी काळात होत असलेल्या ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांसंदर्भात हा दिल्ली दौरा आहे का, आणखी काही वेगळेच कारण आहे, याची चर्चा होत आहे. मात्र, शरद पवार यांचा हा दिल्ली दौरा नियोजित होता, त्यात तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जीही दिल्लीत आहेत. त्यामुळे, काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांनी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यासाठीच, शरद पवार दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधी सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली.