मुंबई : पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ ऐवजी २०१८ची लोकसंख्या लक्षात घेऊन पिण्याचा पाणी पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.आॅडिओ ब्रिजच्या माध्यमातून बीड तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दुष्काळी उपाययोजनेसंदर्भात संवाद साधला. दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येकी ५० सरपंच सहभागी झाले.दुष्काळी भागातील पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, टँकर मंजुरी, चारा छावण्या सुरू करणे, रोहयोमधील कामे यांना आचारसंहितेची कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने आचारसंहितेचे कारण सांगून कोणतेही प्रस्ताव थांबवू नयेत. प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन कामे सुरू करावीत. गावासाठी जादा पाणी टँकर सुरू करणे, नव्याने टँकर सुरु करणे, विहिरींची दुरुस्ती करणे, पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करणे, तलाव दुरुस्ती, नव्याने चारा छावण्या सुरु करणे, चारा छावण्यांची संख्या वाढविणे, रोहयोची कामे सुरु करणे, रोहयो कामाचे पैसे देणे, नळ पाणी पुरवठा योजनेच्या किरकोळ दुरुस्तींना तातडीने मंजुरी देणे अशा अनेक मागण्या सरपंचांनी केल्या. या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करुन अहवाल देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.सहभागी सरपंचांमध्ये बीड जिल्ह्यातील अर्जून शेंडगे, हरिभाऊ पवार, परमेश्वर राठोड, श्रीराम काकडे, तानाजी खामकर, मनोहर खोमणे, जयसिंग नरवडे, विश्वनाथ घुले, उत्तम फड, भाऊसाहेब अवताडे, भगवान चोरमल, वंदना काटे, रेश्मा तोडकर, संगीता पाटील, छाया कवाडे, प्रियंका काशीद, आदींचा समावेश होता.
टँकरसाठी बदलले निकष; आचारसंहितेचा अडसर नाही, मुख्यमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 5:43 AM