मुंबई : इयत्ता दहावीच्या परीक्षेचे तीन पेपर सलग तीन दिवशी आल्याने शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली असताना आता हे वेळापत्रक बदलले जाण्याची शक्यता आहे. २० मार्च रोजी विज्ञान, २१ मार्च रोजी सामाजिक शास्रे-१ आणि २२ मार्च रोजी सामाजिक शास्रे-२ असे सलग तीन दिवस पेपर असल्याचे सध्याच्या वेळापत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे या पेपरसाठी तयारी करण्याकरता फारच कमी वेळ मिळेल, असे पालकांचे म्हणणे आहे. मुंबईतील अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी सलग तीन दिवस पेपर घेण्यास विरोध दर्शविला असून त्यात बदल किमान दोन दिवसांची गॅप द्यावी, अशी मागणी शिक्षण विभागाकडे आज केली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेच्या वेळापत्रकावर शिक्षक परिषदेने हरकत घेतली आहे. २०, २१ आणि २२ मार्च रोजी सलग तीन पेपर होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण येण्याची भीती व्यक्त करत शिक्षक परिषद आणि शिक्षक भारतीने वेळापत्रकात बदल करण्याची मागणी शिक्षण मंडळाकडे केली आहे. (विशेष प्रतिनिधी) >हे अंतिम वेळापत्रक नाहीराज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले की, प्रथेनुसार दहावीचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केलेले आहे. त्याबाबत कोणालाही हरकत किंवा सूचना करण्यास १५ दिवसांचा कालावधी दिलेला आहे. तरी सलग तीन पेपरला हरकत घेत एक दिवसाआड पेपर घेण्याची सूचना पालक व शिक्षकांमधून होत आहे. त्यांच्या सूचनांचे स्वागत करून नक्कीच त्यावर विचार केला जाईल. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर (हॉलतिकीट) छापलेले वेळापत्रक अंतिम वेळापत्रक असेल.>शिक्षक आमदारांचे मंत्र्यांना पत्रसलग तीन पेपर घेण्यास हरकत घेत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी वेळापत्रकात बदल करण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहिले आहे. पालकांकडून या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी होत असून याप्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांना केले आहे.>तिन्ही पेपर हे प्रत्येकी ४० गुणांचे असल्याने त्यात गॅप ठेवलेली नव्हती. तरीही पालक, विद्यार्थी, शिक्षकांची मागणी आली तर शासन योग्य तो निर्णय घेईल.- विनोद तावडे, शिक्षणमंत्री.
दहावीच्या सलग पेपरमध्ये बदल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2016 5:51 AM