मुंबई : अकरावीच्या मराठी विषयाचा अभ्यासक्रम यंदा बदलला आहे. यंदापासून अकरावीच्या जुन्या युवकभारती या पाठ्यपुस्तकाऐवजी मराठी भाषा युवकभारती हे नवीन पाठ्यपुस्तक वापरावे, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत.नवीन अभ्यासक्रमाचे पाठ्यपुस्तक बाजारात उपलब्ध असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले. अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा नववीप्रमाणेच कृतिपत्रिकेनुसार होणार आहे. परीक्षा कशी घ्यायची? याविषयी शिक्षकांना जुलै-आॅगस्टमध्ये व्हर्चुअल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा पाठांतराकडे असलेला कल कमी करण्यासाठी प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका घेण्याचा प्रयोग गेल्यावर्षी नववी इयत्तेच्या विद्यार्थ्यांवर झाला. यंदा दहावी आणि अकरावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांवरही हा प्रयोग करण्यात येईल, असे मंडळाने स्पष्ट केले.धडा आणि कवितेवर प्रश्नोत्तर देवून विद्यार्थ्यांनी पाठांतरावर आधारित उत्तरे लिहिण्याची पारंपरिक सवय मोडण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या विचारक्षमता व थेट कृतीला वाव देण्यासाठी मंडळाने मराठी भाषा विषयाच्या परीक्षेचे स्वरूप बदलले आहे. मराठी, हिंदी, गुजराती, तेलगू, कन्नड, सिंधी या प्रथम भाषा शिक्षकांनी केवळ वाचन आणि पाठांतरापुरत्या शिकवू नये. तर धड्यातील व्याकरण, भाषाभ्यास, वाचन, उपक्रम या स्वाध्यायातील घटकांचा अभ्यासही कृतीच्या माध्यमातून घ्यावा, यासाठी अभ्यासक्रम बदल महत्त्वपूर्ण ठरेल. (प्रतिनिधी)
अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल
By admin | Published: June 20, 2016 5:15 AM