मुंबई : समुद्रात निर्माण झालेल्या नौनक, हुडहुड आणि निलोफर अशा चक्रीवादळांमुळे वातावरणात बदल होत असतानाच आता पुन्हा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात बदल होतील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याने अद्याप वेग धरला नसल्याने राज्याला हुडहुडी भरलेली नाही. तरीही वातावरणात झालेल्या काहीशा बदलामुळे राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान सरासरी १६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. आणि मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचा फरक नोंदविण्यात येत असून, बुधवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६.२, २०.८ अंश नोंदविण्यात आले आहे. मुंबईतील कमाल आणि किमान तापमानाचा सी-सॉ वरखालीच होत असून, मुंबईकरांना बदलत्या तापमानाचा फटका बसत आहे. आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. आता त्याची तीव्रता वाढली असून, त्याचे रूपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. दरम्यान, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. (प्रतिनिधी)
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात बदल
By admin | Published: November 06, 2014 3:23 AM