मुंबई : राजकारणी पदांना चिकटून राहतात अशी टीका सतत होते. मात्र अधिकारीही खुर्चीला चिकटून राहण्याकरिता भूमिका बदलतात. अधिकाऱ्यांच्या उत्तरदायित्वाचा एकदा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. कारण प्रशासनामुळे व्यवस्थेबाबत नाराजी वाढू लागली आहे, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नोकरशाहीवर टीका केली.विरोधी पक्षनेत्यांचे टष्ट्वीटर हँडल आणि फेसबुक पेजचे सोमवारी रिलाँचिंग करण्यात आले. त्यावेळी विखे-पाटील बोलत होते. ते म्हणाले की, नोकरशाहीच्या उत्तरदायित्वाबाबत काहीच बोलले जात नाही. आम्ही राजकीय नेते सत्तेवर येतो व जातो. परंतु खरे सरकार नोकरशाहीच चालवते. काँग्रेसच्या सत्तेच्या काळात आपल्याकडे असलेल्या खात्याशी संबंधित धोरणाला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्याने सत्ताबदल होताच तेच धोरण योग्य असल्याचा अभिप्राय देऊन मंजूर केले. आपण त्या अधिकाऱ्याला याबाबत विचारले असता सत्ताबदलानंतर परिस्थिती बदलल्याने आपण असे केल्याचे सांगितले. मंत्री, खासदार व आमदार खुर्चीला चिकटून राहतात असे आरोप केले जातात. मात्र येथे अधिकारी खुर्चीला चिकटून राहण्याकरिता भूमिका बदलताना दिसत आहेत.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वसाहतीला अलीकडे भेट दिली तर तेथे काही गुंडांनी घुसखोरी केल्याचे निदर्शनास आले. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता आपण कधीही त्या वसाहतीला भेट दिलेली नाही, अशी निलाजरी कबुली त्यांनी दिली. मालवणी दारुकांडातील ६५ जण मृत्यूमुखी पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामात फार व्यस्त असल्याने ते शताब्दी रुग्णालयाकडे फिरकले नाहीत. (विशेष प्रतिनिधी)-------भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे पानितप होणे हा राज्यातील सरकारविरोधी कौल असून यापुढे भाजपाची घसरण सुरूच राहील, असा दावा विखे-पाटील यांनी केला. येत्या पावसाळी अधिवेशनात आक्रमक विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेता पाहायला मिळेल, असे ते म्हणाले.
खुर्चीसाठी अधिकाऱ्यांच्या भूमिकेत बदल
By admin | Published: July 07, 2015 3:15 AM