ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 7 - इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात अखेर बदल होणार आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केल्यानंतर, शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांना वेळापत्रकात बदल करण्याचे आदेश दिले आहेत. इयत्ता दहावीची बोर्डची परीक्षा 7 मार्च ते 29 मार्च 2016 दरम्यान होत आहे. परीक्षेचे वेळापत्रक 29 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आले. वेळापत्रकानुसार 20 ते 23 मार्च 2017 या दरम्यान दहावीचे चार पेपर सलग आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी होती.
त्यामध्ये विज्ञान भाग 2, इतिहास-नागरिक शास्त्र, भूगोल-अर्थशास्त्र आणि आयसीटी या चार विषयांचे (Information and Communication Technology) पेपर सलग आहेत. मात्र, चार विषयांच्या सलग पेपरमुळे अभ्यास कसा करणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर उपस्थित झाला होता.
त्यामुळे या विषयांच्या पेपरदरम्यान सुट्टी हवी, अशी मागणी विद्यार्थी-पालकांनी केली होती. या मागणीची गांभीर्याने दखल घेत, शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांना परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भातील अधिक माहिती https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे.