मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर या उन्हाळी साप्ताहिक विशेष मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ही गाडी ५ मे पासून ते ३० जूनपर्यंत उपरोल्लेखीत मार्गावर धावणार असून, प्रवाशांनी बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.या गाडीचे बुकिंग केलेल्या प्रवाशांना दुसऱ्या मेल, एक्स्प्रेसमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. ज्यांना प्रवास करायचा नाही, त्यांना नियमानुसार तिकिटाची रक्कम परत देण्यात येईल. या वेळापत्रकात बदल केलेल्या विशेष मेल, एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये आणि थांब्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. गाडी क्रमांक ०१३९५ आणि ०१३९६ पुणे ते वलसाड द्विसाप्ताहिक विशेष मेल, एक्स्प्रेसला गर्दी नसल्याच्या कारणाने ही विशेष मेल, एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.नवे वेळापत्रक असे...गाडी क्रमांक ०२०२१ सीएसएमटी ते नागपूर साप्ताहिक विशेष गाडी प्रत्येक रविवारी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांऐवजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सीएसएमटीहून सुटेल. गाडी क्रमांक ०१०७४ नागपूर ते सीएसएमटी साप्ताहिक विशेष गाडी रविवारी सायंकाळी ४ ऐवजी प्रत्येक सोमवारी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी नागपूरहून सुटेल. गाडी क्रमांक ०१०७५ सीएसएमटी ते नागपूर साप्ताहिक विशेष गाडी सोमवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांऐवजी प्रत्येक मंगळवारी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी सीएसएमटीहून सुटेल. गाडी क्रमांक ०१०७६ नागपूर ते सीएसएमटी साप्ताहिक विशेष गाडी प्रत्येक मंगळवारी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांऐवजी दुपारी ४ वाजता सुटेल.
मुंबई-नागपूर उन्हाळी विशेष गाडीच्या वेळापत्रकात बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 6:35 AM