मुंबई : मार्च महिन्यात होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक आॅक्टोबर महिन्यात संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले होते. या संभाव्य वेळापत्रकानुसार, इतिहास, भूगोल आणि विज्ञानाचे पेपर सलग ठेवण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण होते. महत्त्वाच्या विषयांचे सलग तीन दिवस पेपर ठेवू नयेत, अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मान्य करण्यात आली आहे. २० मार्चला विज्ञान, २१ मार्चला सामाजिक शास्त्रे १ आणि २२ मार्चला सामाजिक शास्त्रे २ असे पेपर ठेवण्यात आले होते. एक दिवसाआड पेपर ठेवावेत, अशी मागणी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केली होती.दहावीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून बारावीच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, श्रेणी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर होणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक २९ आॅक्टोबरला संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले होते. त्या वेळेपासून सलग पेपर घेऊ नयेत यासाठी पालक-विद्यार्थी संघटना आणि शिक्षकांचे प्रयत्न सुरू होते.अखेर या विषयाकडे गांभीर्याने पाहून पेपरमध्ये खंड पाडण्यात येईल, असे शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी वेळापत्रकात बदल करण्याचे मंडळाला सांगिल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)
दहावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, सामाजिक शास्त्र व विज्ञानामध्ये सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2016 5:42 AM