पुणे : इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात संख्या वाचनात काही बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना समजण्यासाठी सोपे जावे यासाठी नवीन प्रयोग म्हणून त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे उचित ठरेल, असे मत शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे; परंतु शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींकडून याबाबत सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा केली जात आहे.‘बालभारती’तर्फे इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून, गणित विषयासह सर्वच विषयांचा अभ्यासक्रम बदललेला आहे. त्यात प्रामुख्याने गणिताच्या पुस्तकात २१ ते ९९ या संख्यांचे वाचन व शब्दात लेखन यात बदल केला आहे. सत्त्याण्णवऐवजी नव्वद सात असे शिकवावे; तसेच अठ्ठ्याण्णव, त्र्याण्णव, त्र्याहत्तर, सत्त्याऐंशी, त्रेसष्ट आदी पाठ करावे लागत नाहीत; तसेच लिहावे लागत नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी शिकविताना वीस सात, चाळीस तीन अशा प्रकारचे वाचन व लेखन शिकवावे; परंतु काही विद्यार्थी पारंपरिक पद्धतीने आधीच अठ्ठावीस, सत्तावीस हे शब्द शिकले असतील. त्यामुळे दोन्ही प्रकारचे शब्द ग्राह्य धरावेत. शब्दात संख्या लिहिताना विद्यार्थ्यांना नवी पद्धत सोपी असल्याचे अनुभवता येईल, असे ‘बालभारती’तर्फे पुस्तकाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन प्रयोग म्हणून याकडे पाहिले पाहिजे, असे गणित विषयाच्या अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.........जोडाक्षरे असणारे शब्द हे मुलांच्या मनात गणिताची नावड किंवा भीती निर्माण करू शकतात. त्यामुळे मुलांना सोप्या पद्धतीने गणितातील अंक समजून सांगण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला आहे. इंग्रजी भाषेसह कानडी, तेलगु, मल्याळी व तमीळ या दक्षिण भारतीय भाषांमध्ये याच प्रकारे संख्या वाचन केले जाते. काही अंकांबाबत विद्यार्थी गोंधळून जातात. उदा.७८, २५, २९ या अंकांचा उच्चार केल्यानंतर नेमकी कोणती संख्या पुढे आहे, हे विद्यार्थ्यांना सहज समजत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारा संभ्रम दूर करण्यासाठी या पद्धतीने गणित शिकवावे, अशा सूचना शिक्षकांना देण्यात येत आहे. परंतु, याच पद्धतीने शिक्षकांनी शिकवावे असा कोणताही अट्टहास शिक्षण विभागाने धरलेला नाही.- सुनील मगर, संचालक ,बालभारती........एक नवीन प्रयोग म्हणून या बदलाकडे पाहण्यास काहीही हरकत नाही; परंतु विद्यार्थी समजणे आणि शिक्षकांना शिकवणे सोपे जाईल, त्या पद्धतीने गणिताच्या अंकांची ओळख करून द्यावी. शिक्षण क्षेत्रात असे प्रयोग होण्याची आवश्यकता आहे. - रवी वरे, गणिताचे अभ्यासक
दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात पाढे वाचनात बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 12:20 PM
गणिताच्या पुस्तकातील संख्या वाचनात करण्यात आलेल्या काही बदलाबाबत सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
ठळक मुद्दे‘बालभारती’तर्फे इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात बदलनवीन प्रयोग म्हणून त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे उचित ठरेल, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांचे मत