सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका मात्र कमी झालेला नाही. "कोविड परिस्थितीत निश्चित असे वैद्यकीय उपचार नसल्याने तसेच विषाणूच्या सतत बदलत जाणाऱ्या अवतारांमुळे वैद्यकीय क्षेत्रासमोर आज आव्हान उभे राहिले आहे," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. सध्या आपला डॉक्टरांशी सातत्याने संवाद आणि माझा डॉक्टर ही संकल्पना राबवण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलं. राज्यातील जनतेशी आज त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. दरम्यान, यावेळी त्यांनी राज्यातील निर्बंध १५ जून पर्यंत कायम ठेवण्याची घोषणा केली. तसंच ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्या ठिकाणी निर्बंध शिथिल केले जातील आणि ज्या ठिकाणी प्रादुर्भाव अधिक आहे त्या ठिकाणी निर्बंध वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. "लस आली असली तरी सर्व लोकसंख्येला दोन डोस देण्यापर्यंत कालावधी जाणार आहे. तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग होऊ शकतो ही भीती आहे. हे सर्व लक्षात घेऊन आम्ही सातत्याने सर्व डॉक्टर्सशी संवाद साधण्यावर भर दिला आहे," असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. महाराष्ट्र हा देशातले पहिले राज्य आहे ज्यांनी तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स तयार केला. सर्व जिल्ह्यांत स्थानिक तज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स केले. लहान मुलांमधील कोविडसंदर्भात बाल रोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार केला. दोन्ही टास्क फोर्समध्ये वैद्यकीय उपचारासंदर्भात सतत संवाद होत असतात असंही त्यांनी नमूद केलं.उपचार पद्धतीत एकसूत्रता हवी, विषाणूच्या बदलत्या स्वरूपामुळे डॉक्टर्सना तज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शन व्हावे व त्यांच्या शंकांचे समाधान व्हावे, यावरील नवनवीन माहिती त्यांना मिळावी व सर्व डॉक्टर्सचा सहभाग वाढवा म्हणून ऑनलाईन वैद्यकीय परिषदांचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. लसीकरण वेगवान करणार४५ च्या वरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्रानं घेतली आहे. तर त्या खालच्या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्याची आहे. एकरकमी लसीचे पैसे देण्याचीही आपली तयारी आहे. आपण चोवीस तास लसीकरण करू. आपली क्षमता आहे. परंतु त्याला मर्यादा आहे. लसीची उत्पादन क्षमता तितकी झालेली नाही. जून महिन्यापासून लसीचा पुरवठा सुरळीत होईल असं सांगण्यात आलं होतं. जशा लसी येतील त्याप्रमाणात लसीकरणाचा वेगही वाढवणार आहोत. सव्वादोन कोटी नागरिकांना आपण लसीकरण केलं आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. लवकरच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
Coronavirus : कोरोनाच्या बदलत्या अवतारांमुळे वैद्यकीय क्षेत्रासमोरही आव्हान : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 9:29 PM
राज्यातील निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
ठळक मुद्देराज्यातील निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणालसीकरण अधिक वेगवान करण्यावर भर देणार : मुख्यमंत्री