ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ : एखाद्या व्यक्तीने त्याचे आजनाव बदलले तरी त्यामुळे त्याची जन्मापासून असलेली जात बदलत नाही, असा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाने बदललेल्या आडनावाने अर्ज केलेल्या एका उमेदवाराचा पदव्युत्तर प्रवेशासाठी विचार करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे.शंतनु हरी भारव्दाज या एमबीबीएस डॉक्टरने केलेल्या रिट याचिकेवर न्या. भूषण गवई आणि न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या सुटीकालीन खंडपीठाने असा आदेश दिला की, याचिकाकर्त्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र व आडनाव बदलालंबंधीची सरकारी राजपत्रातील अधिसूचना असेल तर त्याने राखीव कोट्यातून पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी केलेल्या अर्जाचा विचार केला जावा.याचिकाकर्त्याचे वकील अॅड. पी. ए. पोळ यांनी न्यायालयास सांगितले की, भारव्दाज यांच्याकडे अनुसूचित जमातीचा वैध जात पडताळणी दाखला असूनही केवळ त्यांनी आडनाव बदलले आहे म्हणून त्यांना राखीव कोट्यातून पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश नाकारला जात आहे. यावर खंडपीठाने असे नमूद केले की, आडनाव बदलल्याने कोणाची मूळ जात बदलत नाही. आपल्या आडनावातील बदल राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात आला आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत त्यांना राखीव कोट्यातून अर्ज करण्यास नकार दिला जाऊ शकत नाही.