मुंबई : कोट्यवधींच्या रस्ते घोटाळा प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली पाहावयास मिळते.किल्ला कोर्टात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. आतापर्यंत ६२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून त्यात २५ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पालिकेच्या दक्षता विभागाचे माजी मुख्य अभियंता अशोक पवार, उदय मुरूडकर, कार्यकारी अभियंता किशोर येरमे, ठेकेदार दीपन शाह (रेल्कॉन इन्फ्रा प्रोजेक्ट) आणि १० लेखापाल कंपनीचा समावेश आहे. ९० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणे गरजेचे होते. ही मुदत संपत असल्याने प्राथमिक स्वरूपात पहिले तिघांविरुद्ध ३५० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी जर वेळीच त्यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र दाखल केले नसते तर ते यातून सुटले असते, असे शर्मा यांनी सांगितले. आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार, पवारने यात आपला सहभाग नसल्याचे सांगितले. मात्र त्यांनी लेखापाल आणि ठेकेदारांसोबत संगनमताने कट रचल्याचे स्पष्ट होते. यातील पवार यांनी रस्त्यांवर अनेक वेळा भेट देत त्यांची अवस्था चांगली असल्याचे नमूद केले होते. त्या रेकॉर्डचाही यात समावेश आहे. याबाबत खुलासा करणे पवार यांना शक्य झाले नाही. तर मुरूडकरनेही यापैकी एकाही रस्त्यावर भेट न देता सह्या केल्या आहेत. यापैकी गुन्हा दाखल असलेले पालिका कार्यकारी अभियंता वी.वी. अचरेकरचाही यात समावेश आहे. मात्र तो सध्या अंतरिम जामिनावर आहे. या अधिकाऱ्यांनी साइटवर न जाता त्याचे अहवाल चुकीचे असताना ते योग्य असल्याचे दर्शविले. शिवाय त्याची बिले, तसेच बनावट जागेची पाहणी, मापन पुस्तकाचा अहवाल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली. (प्रतिनिधी)
तीन अधिकाऱ्यांवर आरोपपत्र
By admin | Published: October 14, 2016 2:41 AM