ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 8 - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे खूनप्रकरणी आरोपी क्रमांक १ समीर विष्णू गायकवाड यास १६ सप्टेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात १४ डिसेंबर २०१५ ला दोषारोपपत्र (आरसीसी नंबर ९१६ /२०१५ सेशन केस नं. ३/२०१६) सादर केले.
न्यायालयाच्या मंजुरीने भारतीय दंड संहितेच्या कलम १७३ (८) प्रमाणे गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या खून खटल्यात वीरेंद्र तावडे याला एसआयटीने पानसरे खून प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून २ सप्टेंबर २०१६ ला अटक केली आहे. त्याच्यावर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याची मुदत त्यानंतर ९० दिवस असते, परंतु तावडे याच्यावर गुरुवारीच आरोपपत्र दाखल करण्यात आल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाल्याने गोंधळ उडाला.
गुरुवारी तावडे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने ती वाढवून घेण्यासाठीच त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर कोणतेही दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले नसल्याचे विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी स्पष्ट केले.