वाशिम : कारंजा लाड येथील प्रभारी दुय्यम निबंधक संजय इंगळे नेहमीच मद्यप्राशन करून कार्यालयीन कामकाज करीत असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. त्यामुळे येथे कामांसाठी येणार्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या नागरिकांनी मंगळवारी या मद्यधुंद अधिकारी व त्याच्या लिपिकाची वैद्यकीय तपासणी करण्याची जोरदार मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सहायक दुयम निबंधक कार्यालयात शेती खरेदी, प्लॉट खरेदी, गहाण खत तसेच हिस्से वाटणी आदी कौटुंबिक व खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. ७ जून रोजी येथील दुय्यम निबंधक म्हणून रूजू झालेले एल. डब्लू पेशवे हे काही कामानिमित्त २५ जूनपासून महिनाभराच्या रजेवर गेले आहेत. त्यांचा पदभार गेल्या दोन दिवसांपासून अकोला जिलतील बाश्रीटाकळी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक संजय इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला. मात्र त्या मद्यधुंद कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे मंगळवारी उपस्थित नागरिकांनी त्यांना घेराव घातला व त्यांची वैद्यकीय तपासणीची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी प्रभारी दुय्यम निबंधक अधिकारी इंगळे व लिपिक आर.आर. जवके यांना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले.
प्रभारी दुय्यम निबंधकांचा ‘मद्यधुंद कारभार’
By admin | Published: June 29, 2016 1:12 AM