कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित आरोपी समीर गायकवाडने केलेल्या गौप्यस्फोटांचा चौकशी अहवाल बंद लिफाफ्याद्वारे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्याकडे सादर केला. समीरचे पोलिसांवरील सर्व आरोप खोटे असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.न्या. डांगे यांनी समीरशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यानंतर त्याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये १८ डिसेंबरपर्यंत वाढ केली. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गायकवाडला १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. त्याने २१ नोव्हेंबरच्या सुनावणीवेळी पोलिसांवर आरोप केले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. यादव यांनी त्याच्या आरोपाची गंभीर दखल घेत तपास अधिकारी एस. चैतन्या यांना सखोल चौकशी करून ५ डिसेंबरपर्यंत न्यायालयास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चैतन्या यांनी गोपनीय पातळीवर समीरच्या गौप्यस्फोटांची चौकशी सुरू केली होती. समीरचे पोलिसांवरील आरोप पूर्णत: खोटे असल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. तसा अहवाल न्यायालयास सादर केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) १४ डिसेंबरपूर्वी दोषारोपपत्रपानसरे हत्येच्या तपासाचे दोषारोपपत्र ९० दिवसांच्या आत म्हणजे १४ डिसेंबरपर्यंत सादर करणे पोलिसांना बंधनकारक आहे. परंतु त्यास विलंब झाल्यास समीरला जामीन मिळू शकतो, असे विशेष सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी सांगितले. पोटविकाराची तक्रारव्हिडिओ कॉन्फरन्स सुनावणी दरम्यान समीरने त्याला पोटविकाराचा त्रास सुरू आहे. त्यासाठी आयुर्वेदिक औषध त्रिफळा व आवळा चूर्ण देण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली. त्यावर औषधे उपलब्ध करून देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. समीरने केलेल्या आरोपांचा चौकशी अहवाल पोलिसांनी बंधपत्राद्वारे न्यायालयास सादर केला आहे. तो गोपनीय अहवाल असताना पोलिसांनी समीरचे आरोप खोटे आहेत, अशी माहिती पत्रकारांना सांगितली. हे आक्षेपार्ह आहे. - संजीव पुनाळेकर, आरोपीचे वकील
समीरचे पोलिसांवरील आरोप खोटे
By admin | Published: December 06, 2015 2:05 AM