मुंबई : शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप करत अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने राज्यभर २२ आॅगस्टपासून असहकार आंदोलन पुकारलेले आहे. आता ११ सप्टेंबरपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनवाढीसाठी महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती स्थापन केली होती. या समितीने अंगणवाडी कर्मचाºयांना इतर राज्यांत मिळणारे मानधन व इतर सुविधा यांचा अभ्यास करून राज्यातील ९७ हजार सेविका आणि ९६ हजार मदतनीस, तसेच १२ हजार मिनी अंगणवाडी सेविका यांना सेवा ज्येष्ठतेनुसार मानधनवाढीचा अहवाल शासनाला दिला. मात्र शासन मानधनवाढ करीत नसल्याने कृती समितीने ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याची घोषणा केली. तसेच कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी २२ आॅगस्टपासून असहकार आंदोलनात सहभागी झाले आहेत, असे कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी सांगितले.
अंगणवाडी कर्मचा-यांचा ११ सप्टेंबरला संप, शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 4:28 AM