कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकरिता मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर कणकवली प्रांत अधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या भाजप व महाविकासआघाडीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा केला. तसेच आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पुन्हा शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.
जिल्ह्यात मनाई आदेश लागू असताना शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनाई आदेशाचे उल्लंघन करत भंग केल्याप्रकरणी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कणकवली पोलिस स्टेशनमध्ये गुरुवारी रात्री उशीरा या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अटकपूर्व जामीन फेटाळलाशिवसैनिक हल्लाप्रकरणी आमदार नीतेश राणे व संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी तिसऱ्या दिवशी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी फेटाळून लावला आहे. यात राणे यांचा मोबाईल हस्तगत करणे आवश्यक असल्याचे कारण देत न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे.
परब यांच्यावर झाला होता हल्लाजिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी खुनी हल्ला झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत एकूण सहा संशयिताना अटक केली आहे. यामध्ये स्वाभिमानचे पुणे येथील कार्यकर्ते सचिन सातपुते यांना अटक केल्यानंतर पोलिसांची चक्रे आमदार राणे व सावंत यांच्या दिशेने फिरली होती. त्यामुळे या दोघांनी २७ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.