सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील चार कोटी १८ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांनी ४० माजी संचालक, तीन माजी कार्यकारी संचालक, ११ अधिकाऱ्यांसह १६ वारसदार अशा ७० जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. येत्या २४ सप्टेंबरला यासंदर्भात सुनावणी होणार आहे. जिल्हा बँकेचे २00१-0२ ते २0११-१२ या कालावधीतील बँकेच्या प्रधान कार्यालयाचे रंगकाम व दुरुस्ती, अमृतमहोत्सवी कार्यक्रमातील खर्च, नोकरभरती, इमारत बांधकामासाठी केलेला खर्च, बँक गॅरंटी शुल्क परत देण्याचा व्यवहार, बचत गट संघास दिलेले मानधन, निवृत्त अधिकाऱ्यांवर केलेला पगाराचा खर्च, जादा दराने केलेली सीसीटीव्ही खरेदी, एकरकमी परतफेड योजनेतील सवलत, संचालक मंडळांचा अभ्यास दौरा अशा अनेक नियमबाह्य गोष्टी निदर्शनास आल्या होत्या. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ८८ नुसार जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांनी बँकेचे संचालक, अधिकारी व मृत संचालकांचे वारसदार अशा एकूण ७० जणांवर सहकार अधिनियम ७३ (३) अन्वये आरोप निश्चित केले आहेत. बँकेच्या नुकसानीला संबंधितांना जबाबदार धरून वसुली का करण्यात येऊ नये, अशी नोटीसही त्यांनी बजावली आहे. (प्रतिनिधी)
७० जणांवर आरोपपत्र दाखल
By admin | Published: September 06, 2015 2:19 AM