ठाणे, दि. 11 - रायगड जिल्ह्यातील कोंडाणे धरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे. ठाण्यातील सत्र न्यायालयात सीबीआयनं 3 हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यासह सहा अधिका-यांची नावं टाकण्यात आली आहे.रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील कोंडाणे धरण प्रकल्पात अनियमितता झाली आहे. प्रकल्पाच्या मूळ किंमतीत भरमसाट वाढ झाल्यानंतर या प्रकल्पाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. प्रकल्प रखडल्यामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागतोय. पावसाळ्यात तुडुंब भरणा-या उल्हास नदीत उन्हाळ्यातून पाण्याचा खडखडाट असतो. पाण्याअभावी रायगड जिल्ह्यात भेगा पडलेली शेती पाहायला मिळते.उल्हास नदीवर धरण व्हावं, ही गेल्या 40 वर्षांपासूनची स्थानिकांची मागणी होती. त्याच पार्श्वभूमीवर कोंडाणे धरण बांधण्यात येत होते. मात्र या धरणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, या प्रकल्पाचं काम रखडलं आहे. जास्त रकमेच्या बोगस निविदा काढून कंत्राटदारही मालामाल झाले आहेत.या धरणामुळे कर्जत तालुक्यांतील जवळपास 20 ते 25 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. तसेच कल्याणपर्यंत उल्हास नदीतील पाण्याचा साठा कायम राहणार असल्यानं इतर शहरांचा पाणीप्रश्नही कायमचा निघाली निघणार होता. कंत्राटदार आणि जलसंपदा खात्याच्या भोंगळ कारभारामुळे प्रकल्प अडचणीत सापडलाय. मात्र त्याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागतो आहे.
कोंडाणे धरण घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल, सुनील तटकरेंसह सहा अधिका-यांची नावं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 3:36 PM