मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या तीन जिल्हा शाखांमधून काढण्यात आलेल्या २५ कोटी रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास राज्य मंत्रिपरिषदेने शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी परवानगी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील आ. रमेश कदम हे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मुख्य आरोपी आहेत. या घोटाळ्यात बुलडाणा, जालना आणि भंडारा येथील साठे महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या खात्यातून २५ कोटी रुपये काढण्यात आले होते. ही रक्कम महामंडळाच्या मुंबई मुख्यालयांतून या जिल्हा कार्यालयाच्या खात्यांमध्ये वळती करण्यात आली आणि नंतर ती जिल्हा कार्यालयांनी काढून घेतली. या रकमेचा अपहार झाला. मुंबईतून आलेल्या काही लोकांनी बंदूक काढून जीवे मारण्याची धमकी दिली व ही रक्कम घेऊन पोबारा केला, अशाही तक्रारी नंतरच्या काळात झाल्या. सीआयडीने या प्रकरणी सखोल चौकशी केली. त्यानंतर सदर प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी सीआयडीने राज्यपालांना मागितली. ‘माझी परवानगी घेण्याच्या आधी राज्य मंत्रिपरिषदेची मान्यता घेतली आहे काय, अशी विचारणा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्य शासनाला केली. त्यावर, शासनात धावपळ उडाली आणि काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्रिपरिषदेची मान्यता घेण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)
२५ कोटींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल होणार
By admin | Published: April 09, 2017 12:23 AM