मुंबई : जगविख्यात वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास वरळी येथील ख्रिश्चन धर्मीयांच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दादर येथील पोर्तुगीज चर्चमध्ये सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कारापूर्वीची प्रार्थना करत चार्ल्स कोरिया यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली व त्यांचे अंत्यदर्शन घेतले.भारतातील आधुनिक वास्तुकलेचा चेहरा असलेल्या चार्ल्स कोरिया यांचे मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले. चार्ल्स कोरिया यांचीच रचना असलेल्या दादर येथील पोर्तुगीज चर्चमध्ये गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी मोनिका, मुलगी नंदिता आणि मुलगा नकुल उपस्थित होते. विशेषत: चार्ल्स यांच्या निकटवर्तीयांपैकी श्याम बेनेगल, ज्युलिओ रिबेरो, राहुल मेहरोत्रा, हाफीज कॉन्ट्रॅक्टर, अनिल झारकर, राहुल डिकोना, नैना कत्तालिया यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील नामांकित व्यक्ती या वेळी उपस्थित होत्या.पोर्तुगीज चर्चमध्ये चार्ल्स यांचे पार्थिव आणण्यात आल्यानंतर त्यांचे चुलतभाऊ हेरिडिया यांनी सर्वप्रथम प्रार्थना केली. प्रार्थनेनंतर येथे उपस्थितांनी चार्ल्स यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाची दादर येथून वरळी येथील ख्रिश्चन धर्मीयांच्या स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली आणि त्यानंतर येथे त्यांचे पार्थिव रीतीरिवाजानुसार दफन करण्यात आले. (प्रतिनिधी)
चार्ल्स कोरिया अनंतात विलीन
By admin | Published: June 19, 2015 1:58 AM