सोमनाथ खताळ
औरंगाबाद, दि. 7 - हनुमान टेकडीवरील डोंगारात कोरलेल्या बौद्ध लेण्यांचे आकर्षण पर्यटकांसाठी आजही कायम आहे. या लेण्यांना भेट दिल्यावर पर्यटकांना शिल्पकलेचा विस्तृत नमुना पहावयास मिळतो. तसेच या टेकडीवरून नजर फिरविल्यावर क्षणार्धात संपूर्ण औरंगाबाद शहराचे दर्शन पर्यटकांना घडते. थोड्याफार असुविधा वगळता इतर परिस्थिती येथे बऱ्यापैकी आहे. हिवाळा आणि पावसाळ्यात येथे पर्यटकांचा जास्त ओढा असतो. डोंगर माथ्यावरून पाहिल्यावर परिसराने हिरवा शालूच पांघरला की, काय असे दिसून येते. उन्हाळ्यात मात्र हा परिसर उजाड असतो. परिसरातील झाडे वाळल्यामुळे उन्हाचे चटके पर्यटकांना बसतात. त्यामुळे उन्हाळ्यात दुरचे पर्यटक येथे येत नाहीत. परिसरातील विद्यार्थी अथवा जवळपासचे नागरिकच येथे भेट देत फोटोसेशन करून परतत असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत अशीच परिस्थिती आहे.
या लेण्याच्या पायथ्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा निसर्गरम्य परिसर आहे. तर याच्या अवघ्या काही अंतरावर मिनी ताजमहल असणारे बेबी का मकबरा आणि ऐतिहासीक पाणचक्की आहे. हा लेणी समूह पूर्व-पश्चिम डोंगररांगेत दोन गटात विभागलेला आहे. यात एकूण ९ लेण्या आहेत. या लेण्या बौद्धधर्मीय म्हणून ओळखल्या जातात. यात मध्ये क्र. ५ भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती व क्र.६ मध्ये श्रीगणेशाची एक मूर्ती आहे. एक लेणी हीनयान असून उर्वरित आठ लेण्या महायान पंथाच्या आहेत. लेणी क्र. ४ मध्ये चैत्यगृह असून ही हीनयान पंथाची आहे. एक चैत्यग्रह सोडलयस बाकी सगळे विहार आहेत.
ही सर्वात प्राचीन लेणी आहे. इ.स.तिसऱ्या शतकातील असावी. उर्वरित लेण्या ७ व्या शतकापर्यंत खोदण्यात आल्या. लेणी क्र. १ ते ७ व ९ या लेण्या प्रेक्षणीय आहेत. येथे हीनयान, महायान व वज्रयान हे सर्व बौद्ध पंथ येथे एकत्र आढळतात. येथे बोधिसत्व पद्मपाणी, अवलोकितेश्वर व वज्रपाणी यांच्या भव्य मूर्ती आहेत. पद्मपाणीच्या हातात कमळ, अवलोकितेश्वराच्या मुकुटात बुद्धाची मूर्ती व वज्रपाणीच्या मुकुटात स्तूप असते. पहिल्या गटापासून दुसऱ्या गटाचे अंतर अंदाजे एक किलोमीटर आहे. अजिंठा व वेरूळ प्रमाणे याही लेण्या रंगीत होत्या. परंतु सद्यस्थितीत अनेक लेण्यांचा रंग निघून गेल्याचे दिसून येते. त्यामुळे लेण्या पहिल्यासारख्या पर्यटकांना आकर्षित करीत नाहीत.
काय आहे लेण्यांचे वैशिष्ट्ये
लेणीक्र. २ : दीर्घिका, मध्यवर्ती दालन व प्रदक्षिणा मार्ग अशी या लेणीची रचना आहे. यातील गाभाऱ्यात भगवान गौतमबुद्धाची प्रलंबपाद आसनातील भव्य मूर्ती आहे. उजवीकडे विविध आसनातील बुद्ध मुर्ती आहेत. यात शिल्पकाम भरपूर आहे परंतु त्याची झीज झालेली आहे.
लेणीक्र. ३ : हे एक प्रेक्षणीय विहार आहे. यातील सभा मंडपात बारा सुशोभित स्तंभ आहेत. सर्व स्तंभ वेगवेगळ्या नक्षीकामांनी सजविलेले आहेत. येथे एका स्तंभाच्या नाटेवर (तुळई) सूतसोम जातक कथेचे शिल्प कोरलेले आहे. गाभाऱ्यात प्रलंबपाद आसनातील सिंहासनावर बसलेली भगवान बुद्धाची मूर्ती आहे. मूर्तीच्या उजव्या व डाव्या बाजूस आदरभावयुक्त भक्तजन दाखविण्यात आले आहेत. हे भक्तजन आफ्रिकेतील कृष्णवर्णीय असावेत असे त्यांच्या केसाच्या रचनेवरून वाटते.
लेणी क्र. ४ : ही येथील सर्वात प्राचीन लेणी आहे. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील असावी. हीनयान पंथाचे हे चैत्यगृह आहे. यातील तुळ्याचे छत व स्तूपावरील कोरीव काम अतिशय कुशलतेने केलेले आहे.
लेणी क्र. ५ : या लेणीत जैन तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांची ध्यानस्थ मूर्ती आहे.
लेणी क्र. ६ : या लेणीपासून पुर्वेकडील गटास आरंभ होतो. या लेणीची दोन दालने आहेत. पहिल्या दालनात श्री. गणेशाची मूर्ती आहे. त्यासोबत सप्तमातृका कोरलेल्या आहेत. बाजूला भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे. दुसऱ्या दालनात भगवान बुद्धाची मूर्ती व काही बौद्ध शिल्पे आहेत.
लेणी क्र. ७ : त्या काळातील शिल्पकलेचे काही अप्रतीम नमुने आजही या लेणीत आहेत. सकाळची सूर्यकिरणे थेट गाभार्यात भगवान बुद्धाच्या मूतीर्ला स्पर्श करतात. त्यामुळे ही मूर्ती सजीव व चैतन्यमयी भासू लागते. मूर्तीच्या एका बाजूला नर्तकीचा एक अलौकिक शिल्पपट आहे. हा शिल्पपट शिल्पकलेच्या इतिहासातील एक मानबिंदू समजला जातो. यात नृत्यात तल्लीन झालेली नर्तिका व वाद्यवृंदासह साथ देणाऱ्या युवतींचे कोरीव काम देखणे व अतिशय विलोभनीय आहे. हा शिल्पपट अंधारात आहे. प्रकाश परावर्तीत करणाऱ्या बोर्डाच्या साहाय्याने या शिल्पातील सौंदयार्चे दर्शन घडते. अंधार असलेल्या सर्व लेण्यांत अशा बोर्डाची व्यवस्था आहे. गाभाऱ्यातीलप्रवेश दारावर पद्मपाणी अवलोकितेश्वर यांची उभी मूर्ती असून त्यांच्या दोन्ही बाजूस अष्टमहाभयाचे प्रसंग कोरलेले आहेत. याच्या डावीकडील दालनात ध्यानी बुद्धाच्या व उजवीकडील दालनात पांचिक व हरितीचे शिल्प आहे.
लेणी क्र. ९ : ही येथील सर्वात भव्य लेणी आहे. यात भगवान गौतम बुद्धाचे महापरिनिवार्णाचे विशाल शिल्प ओ. हे शिल्प अर्धवट व जीर्ण अवस्थेत आहे. या लेणीतील काही मूर्तिंच्या डोक्यावरील नागफणीचे काम अतिशय उत्कृष्ट आहे
संरक्षणाची गरजhttps://www.dailymotion.com/video/x844qk2 ऐतिहासीक असणाऱ्या या लेण्यांना धोका पोहचू नये, यासाठी पुरातत्व विभागाकडून याचे संरक्षण करण्याची गरज आहे. येथे पर्यटकांसाठी आरामाची व त्यांना बसण्याची सोय करण्याची मागणीही पर्यटकांमधून केली जात आहे. एवढेच नव्हे तर काही लेण्यांच्या डोक्यावर दगडांना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ते कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. हे दगड कोसळणार नाहीत किंवा कोसळले तरी याचा धोका पोहचणार नाही, या दृष्टिकोणातून येथे उपाययोजना करण्याची गरज आहे. याबाबत अनेकवेळा पर्यटकांनी मागण्या केल्या, परंतु याची गांभीर्याने अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे पर्यटकांमधून संताप व्यक्त होत आहे.