ठाणे: राज्यभरात आज अगदी जल्लोषात शिवजयंती साजरी झाली. राजकीय पक्षांनी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं. अनेक नेत्यांनी बॅनर लावून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र भाजपाच्या एका नेत्यानं ठाण्यात लावलेली बॅनर्स सर्वत्र व्हायरल झाली आहेत आणि ती चर्चेचा विषय ठरली आहेत.भाजपाचे बिपीन गेहलोत यांनी संपूर्ण शहरात शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारी बॅनर्स लावली. मात्र या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही. त्यामुळे यामध्ये महाराज आहेत कुठे? या बॅनरवरील महाराज शोधून दाखवा, असे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. यानंतर शहरात लावण्यात आलेले बॅनर बदलण्यात आले. मात्र काही ठिकाणी शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे, मात्र शिवाजी महाराजांचा फोटोच नसलेले बॅनर कायम आहेत. बिपीन गेहलोत यांची भारतीय जनता युवा मोर्चाचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्याबद्दलच्या अभिनंदनाची एक ओळ बॅनरवर आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व ठाणेकरांना हार्दिक शुभेच्छा, असा मजकूरदेखील त्यावर आहे. मात्र ज्या शिवरायांची जयंती आहे, त्यांचा फोटो बॅनरवर कुठेच नाही. विशेष म्हणजे भाजपा नेते महाराजांचा फोटो छापायला विसरले असले, तरी त्यांना वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचा विसर पडलेला नाही. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह एकूण 32 जणांचे फोटो आहेत.
Challenge... शिवजयंतीच्या 'या' बॅनरवर शिवाजी महाराज शोधून दाखवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 9:16 PM