लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : घरदुरुस्तीच्या वादातून ठाकुर्लीत कंत्राटदार किशोर चौधरी यांना गोळ्या घालून ठार मारणारे प्रमुख आरोपी दिलीप भोईर, शंकर भोईर, सुरज भोईर आणि चिराग ऊर्फ सागर भोईर या चौकडीला विशेष पथकाने गुरुवारी दुपारी कोळेगावातून अटक केल्याची माहिती कल्याण परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र, याप्रकरणी अधिक माहिती शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, याच प्रकणात कुणाल आंधळे (२६) आणि परेश आंधळे (२३, दोघेही रा. ठाकुर्ली) यांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने नाशिक येथील मालेगावातून गुरुवारी पहाटे सापळा रचून बेड्या ठोकल्या. बालाजीनगरमधील देवी शिवामृत सोसायटीत घर दुरूस्तीचे काम मंगळवारी सुरू होते. त्यावेळी आमच्या भागात येऊन काम का करतो, असा सवाल आरोपी दिलीप व शंकर भोईर आणि इतर साथीदारांनी किशोर किसन चौधरी (४२) यांना केला. या वेळी चौधरी यांच्यासोबत नितीन कृष्णा जोशी (३५), महिमादास विल्सन हे तेथे होते. चौधरी आणि भोईर यांच्यात बाचाबाची झाली. त्या वेळी संतप्त झालेल्या भोईरनी किशोर यांच्या डोक्यात व पोटात १२ गोळ्या घातल्या. त्यात ते जागीच ठार झाले. नितीन जोशी यांना एक गोळी लागली असून त्यांच्यावर रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. या गुन्ह्यातील भोईर कुटुंबातील चौघे, परेश-कुणाल आंधळे हे दोघे भाऊ आणि आणखी अनोळखी चार आरोपी फरारी होते. रामनगर पोलीस आणि कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने शोधांसाठी पथके पाठवली होती. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, सहायक पोलीस निरीक्षक विजय खेडेकर, दत्ता भोसले, नरेश जोगमार्गे यांनी खबऱ्यामार्फत माहिती मिळवून कुणाल व परेश यांना मालेगाव येथून अटक केली. विल्सनचा अद्याप शोध नाहीच-किशोर चौधरी यांच्या कार्यालयात मंगळवारी घटना घडली, त्यावेळी हजर असलेला महिमादास विल्सन (१९) हा देखील त्या गोळीबारात जखमी झाला. या घटनेनंतर तोही बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची आई अॅन्थोनी अम्मा यांनी दिली होती. मात्र, चौधरी हत्येप्रकरणी सहा जणांना अटक केली असली तरी गुरुवारी विल्सनचा शोध लागलेला नव्हता.
चौधरी हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत
By admin | Published: May 12, 2017 3:15 AM