ठाणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे गजेंद्र चौहान तब्बल सहा महिन्यांनी हाती घेणार आहेत. १८ डिसेंबरला माहिती व प्रसारण मंत्रालयाबरोबर विद्यमान २६ सदस्यांची बैठक एफटीआयआयच्या कॅम्प्समध्येच होणार आहे. विद्यार्थी त्याला विरोध दर्शविणार असल्याचे समजते. गजेंद्र चौहान यांच्यासह इतर सदस्यांच्या नियुक्त्या रद्द होण्यासाठी उगारलेले आंदोलनाचे हत्यार विद्यार्थ्यांनी दोन महिन्यांपूर्वी मागे घेतले. तरीही या नियुक्त्या रद्द होत नाहीत, तोवर शांततेत विरोध केला जाईल, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता. आता चौहान काही दिवसांतच अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत असल्यामुळे, एकप्रकारे सरकारच विजयी ठरली असल्याची चर्चा आहे.चौहान यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही या बैठकीबाबत दुजोरा दिला असून, अध्यक्षपदाची सूत्रे घेणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तथापि, बैठकीच्या अजेंड्याची प्रत मिळालेली नाही. विद्यार्थ्यांनी कितीही विरोध केला, तरी बैठक शांततेतच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
चौहान लवकरच अध्यक्षपद स्वीकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2015 1:45 AM