मुंबई : युरोप, इंग्लंडमध्ये उच्चपद व गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीच्या आमिषाने गरजूंना गंडा घालत असलेले एक रॅकेट बोरीवलीत उघडकीस आले आहे. या प्रकरणी तीन महिलांसह चौघांविरुद्ध गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला बोरीवली पोलिसांनी अटक केली आहे. सुभाष मनोरे असे अटक केलेल्याचे नाव आहे. जया श्रीवास्तव, नीतू श्रीवास्तव व अनिता ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवाहरनगर येथील प्रशांत पोर्लेकर यांची पत्नी एका शाळेत शिक्षिका असून, त्याच्या सहकारी अनिता ठाकूर यांनी त्यांना माझ्या बहिणीचे ‘जॉब प्लेसमेंट’चे कार्यालय आहे, असे सांगून प्रशांत पोर्लेकर यांना युरोपमध्ये एका हॉटेलमध्ये चालकाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून, बहीण जया श्रीवास्तव हिच्याशी संपर्क करण्यास सांगितला. त्यानंतर, त्यांनी अन्य दोन सहकाऱ्यांच्या सहाय्याने वेळोवेळी कार्यालयात बोलावून बनावट कागदपत्रे दाखवून त्यांना नियुक्तीपत्र दिले. त्यासाठी ४ लाख रुपये, पासपोर्ट घेतला. मात्र, व्हिसा मिळत नसल्याचे सांगत, नोकरीला पाठविण्यात दिरंगाई केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांना या एजंटांनी अन्य नागरिकांचीही अशा प्रकारे फसवणूक केल्याचे समजले. त्यानंतर, पोलिसांकडे धाव घेऊन याबाबत तक्रार केली. पोलिसांनी मॅनेजर सुभाष मनोरे याला अटक केली. (प्रतिनिधी)
परदेशात नोकरीच्या आमिषाने फसवणूक
By admin | Published: February 13, 2017 4:02 AM